मुंबईतली मांसाहारी भोजनगृहं

माझ्या लहानपणी उपाहारगृहात खायला जाणं ही चैन समजली जाई. आमची शाळा दूर असली तरी सकाळी जेवून निघत असल्याने आणि एकूणच आर्थिक परिस्थितीमुळे पैसे मिळत नसत. कधी मिळालेच तर चणेशेंगदाणे किंवा शाळेजवळच्या बिस्कीटाच्या दुकानात स्वस्तात मिळणारा बिस्कीटाचा चुरा (यात खाऱ्या बिस्कीटांचा थोडी साखर घातलेला चुरा छान लागे) खात असू. आमची शाळा शारदासदन शाळेच्या इमारतीत होती, त्यांच्या कँटीनचा बटाटेवडा चांगला असे पण तो खाल्ल्याचे फार आठवत नाही.

दादर, गिरगावात जी उपाहारगृहं असत ती मुख्यतः ब्राह्मणी खाद्यपदार्थ पुरवणारी असत. गिरगावातल्या कुलकर्ण्यांच्या उपाहारगृहात लोक भजी आणि वालाची डाळिंबी खायला जात. तेव्हा उडप्यांची उपाहारगृहं नुकती उगवू लागली होती. इराण्यांची मात्र ठिकठिकाणी असत. तिथे लोक बनमस्का, खारी यांच्याबरोबरच खिमा पाव, ऑम्लेटपाव खायला जात. मी रहात असे  त्या लालबाग भागात लाडूसम्राट हे प्रसिद्ध दुकान होतं, तिथले लाडू तर लोक खातच शिवाय दादरच्या पणशीकरांकडे किंवा गिरगावातल्या उपाहारगृहात लोक पियूष प्यायला जात तेही तिथे मिळत असे. तिथे मिसळही चांगली मिळे. काळाचौकीकडे जाणाऱ्या रस्त्याच्या कोपऱ्यावर सरदार नावाचं उपाहारगृह होतं. तिथली वांगी भजी प्रसिद्ध होती. तिथे मराठी पदार्थ अधिक असत. नंतर तेही उडप्यांसारखे इडली, डोसा ठेवू लागले.

पण भोजनगृहांच्या बाबतीत जरा वेगळी परिस्थिती होती. दादर गिरगावातल्या भोजनगृहात पुरणपोळी, खरवस, डाळिंबी उसळ, अळूचं फदफदं, उकडीचे मोदक, बटाटा भजी असे पदार्थ रोजच्या जेवणातल्या भाजीआमटीसोबत घेता येत. पण महाराष्ट्रात शाकाहारातही जे प्रांतानुसार वैविध्य आहे ते तेव्हाच्या भोजनगृहांत फारसं आढळत नसे.

मांसाहाराच्या बाबतीत मात्र परिस्थिती वेगळी होती. गिरगाव ते सायन बांद्र्यापर्यंत पसरलेल्या मुंबईत मांसाहारी भोजनात वैविध्य होतं. भायखळा भागात पारसी, मुस्लीम आणि ख्रिश्चन या तिन्ही पद्धतीची मांसाहारी भोजनगृहं होती. बांद्र्यात आणि माहीम भागात गोव्याकडच्या ख्रिश्चन पद्धतीचा आणि मुस्लीम पद्धतीचा मांसाहार देणारी भोजनगृहं होती आणि  मी लालबागहून गिरगावात शाळेत जातांना फोरास रोड भागात तर खूपच छोटी छोटी मांसाहारी भोजनगृहं, भटारखाने आणि तिथे हातावर थापून बनवलेल्या रोट्या रस्त्यालगत असलेल्या शेगड्यावर शेकणारे स्वयंपाकी दिसत असत. असे भटारखाने आजही माहीम भागात आढळतात. फोर्टातल्या हुतात्मा चौकाच्या, जुन्या हँडलूम हाऊसच्या मागच्या गल्ल्यांमध्ये कारवारी आणि केरळी पद्धतीचा मांसाहार पुरवणारी छोटी उपाहारगृहं होती, त्यातली काही अजूनही शिल्लक आहेत. तिथे सकाळच्या वेळी इडीअप्पम्, मलबार परोठा इ. पदार्थ नाश्त्यासाठी मिळत.

लालबाग परिसरात तेव्हा गिरणी कामगार खानावळ्यांमधून जेवत असत. तिथे शाकाहारी आणि मांसाहारी दोन्ही पद्धतीचं जेवण तर मिळेच, शिवाय तिथेच आपापली ट्रंक, वळकटी ठेवून गिरणीतली पाळी संपल्यावर वळकटी पसरून झोपताही येई. शिवाय घाटी लोकांची, मालवण्यांची अशा वेगवेगळ्या खानावळी असत तिथे आपल्या आवडीप्रमाणे जेवता येई. पण काही ठिकाणी आमटीच्या नावाखाली पातळ पाणी, भात वाढतांना तर भातवाढीत भाताचा किती पातळ थर घ्यायचा याची स्पर्धा असल्यासारखं वाढत. माझे सासरे घाटावरचे असले तरी चंदर आणि ते काही काळ एका मालवणी बाईकडे जेवत आणि चंदरला ते जेवण आवडत असे. समुद्रातले मासे खाण्याची आवड तिथेच जोपासली गेली.

या खानावळींसोबत कोपऱ्याकोपऱ्यांवर भंडारी भोजनगृहं असत. ही साधारण बोळकंडीसारखी रचना असलेली, मोजकी टेबलं टाकून भिंतीकडे तोंड करून जेवता येईल अशी असत. वाढप्यांच्या कळकट पोशाखाकडे आणि एकूण स्वच्छतेकडे जरा काणाडोळा करावा लागला तरी चव छान असे. तिथे मालवणी पद्धतीचे तळलेले मासे, माशाची विशेषतः बांगड्याची कढी, तिखलं, तिसऱ्या, खेकडे यांच्याइतकेच वज्री, कलेजी, भेजा असले पदार्थ जास्त खाल्ले जात किंवा जवळपासच्या चाळीत रहाणाऱ्या कुटुंबांतून कधी कधी मागवले जात. माझ्या मोठ्या बहिणीच्या मैत्रिणीची आई लालबागच्या कामगार मैदानाच्या जवळच्या अशाच एका भोजनगृहातून मटण आणायला स्टीलचा डबा देऊन पाठवत असे. भारतमाता सिनेमाजवळ क्षीरसागर आणि दत्त बोर्डींग ही मांसाहारी भोजनालयं नामांकित होती (अजूनही आहेत).  परेल, डिलाईल रोड, ग्रँट रोड भागातही अशी भोजनगृहं मला आढळली होती. चवीच्या दृष्टीने पदार्थ उत्तम असत आणि मुख्य म्हणजे खिशाला परवडणारे असत. आमच्या कार्यालयाच्या जवळ, कुलाब्यालाही सेंट्रल नावाचं, तर रिझर्व बँकेच्या मुख्यालयाजवळही असं  एक भोजनगृह होतं. सेंट्रल अजूनही चालू आहे. तिथे जवळच्या ससून डॉकवरून घेतलेले ताजे मासे असल्याने आलंलसूण न लावता केलेले मासेही चवीला छान लागतात. गिरगावात शाकाहारी भोजनगृहासोबत काही मोजकी मांसाहारी भोजनगृहं होती. रेळे बिल्डींगमधलं समर्थ आणि खोताच्या वाडीतलं अनंताश्रम.

आमची शाळा तिथून जवळच असली तरी तिथे जायचा योग फार उशिरा म्हणजे मी बँकेत नोकरी करायला लागल्यावर आला. आसपासच्या कार्यालयातले, बँकांमधले कर्मचारी तिथे जेवणाच्या सुट्टीत खादाडी करायला जात. विशेषतः श्रावण सुरू व्हायच्या आधी तिथे जाऊन जेवायला गर्दी होत असे. जेवायला आलेले नोकरदार संध्याकाळच्या जेवणासाठी किंवा घरच्यांच्या खास आवडीनुसार पदार्थ बांधूनही घेत. असे नोकरदारच नव्हे तर आसपासच्या परिसरातील ज्यांच्या घरातल्या बायका काही कारणाने बाहेरगावी गेल्या असतील किंवा अख्खं कुटुंबच बाहेर गेलं असेल असे एकांडे पुरूषही बायका घरी परतेपर्यंत तिथे सकाळसंध्याकाळ जेवायला येत. जयवंत दळवीही तिथे नेहमी जेवायला येत असं म्हणतात. मी एकदा त्यांना तिथे पाहिलंही होतं. ते भोजनगृहाच्या एका विशिष्ट भागातच बसत म्हणे. तिथला स्वैंपाक हा चुलीवर केला जाई. ताजा मसाला पाट्यावर वाटतांना तिथले कर्मचारी दिसत. मसालेही त्यांनी घरी केलेले असत. चपात्या घरच्या चपात्यांसारख्या लागत. मासेही खास ताजे खरेदी केले जात. या सगळ्यामुळेही असेल पण चव उत्कृष्ट असे. पुढे दोन भावातल्या भांडणापायी ते भोजनगृह बंद केलं गेल्याची बातमी वाचल्यावर अनेक खवय्ये हळहळले. नंतर अर्थात मालवणी मांसाहारी पदार्थांच्या भोजनगृहांचा सुळसुळाट गल्लोगल्ली झाला.

मात्र त्या काळी कोल्हापुरी, सातारी पद्धतीच्या मांसाहाराची भोजनगृहं जशी फारशी नव्हती तशीच आजही. विदर्भ, मराठवाड्याकडच्या मांसाहाराबाबतही तेच घडतंय. आगरी आणि कोळी पद्धतीचे पदार्थ देणारी भोजनगृहं तेव्हा मर्यादित असली तरी आता मात्र जागोजागी उपलब्ध आहेतच शिवाय मालवणी खाद्यजत्रेसारख्याच कोळी, आगरी खाद्यजत्राही भरतात. गोमंतकीय पद्धतीचा मांसाहार गेली बरीच वर्षे दादरच्या गोमंतकमध्ये मिळतो. पार्ल्यात गजालीमध्येही बरेच लोक मांसाहारासाठी जातात. चांद्रसेनीय कायस्थ प्रभुंचा वैशिष्ट्यपूर्ण मांसाहार काही तुरळक ठिकाणी उपलब्ध होता तसाच तो आजही असला तरी त्यांचाही महोत्सव दर वर्षी आयोजित केला जातो.

नव्वदच्या दशकात एकदा आमच्या लग्नाच्या वाढदिवसानिमित्त ‘तेंडुलकर्स’मध्ये जेवायला गेलो होतो. तिथला सारस्वती पद्धतीचा कोळंबीचा रस्सा आणि बोंबिल (जे अजिबात तेलकट नव्हते) अप्रतिम होते. पण नंतर तो डायनर्स क्लब झाल्यावर तिथे जाणं अशक्य झालं. तसंही असे प्रकार जनसामान्यांच्या आटोक्याबाहेरचेच. माहीम आणि अंधेरीला असलेलं अवचटांचं दिवा महाराष्ट्राचाही असंच. तिथे कुणीही जाऊ शकतं. जरा वेगळे पदार्थ जसं की भरलेले बोंबिल, भरलेले खेकडे, खिमा थालीपीठ, उकडीचे खिमा मोदक (हा प्रकार मी स्वतःही ऐंशीच्या दशकात करुन पाहिला होता), नारळाच्या दूधातलं कोलंबीचं सूप वगैरे मिळत असले तरी तेही जरा सामान्यांच्या आटोक्याबाहेरचंच.

मुस्लीम पद्धतीचे बिर्याणी, कबाब, खिमा, मटण इ. पदार्थ तर कुलाब्यापासून वांद्र्या कुर्ल्यापर्यंत सगळीकडे मिळत. कुलाब्यातल्या बडे मियाँच्या गाडीवर संध्याकाळी तोबा गर्दी उसळत असली तरी जरा उच्च मध्यमवर्ग दिल्ली दरबारकडे मोहरा वळवत असे. बडे मियाँनेही आता अशा उच्चभ्रूंसाठी एशियाटीक ग्रंथालयापासून दोन मिनिटांवर वातानुकूलित भोजनगृह उघडलंय. खास रमजानच्या काळात आणि एरवीही बारा हंडी, डोंगरी, महंमद अली रोडवरच्या मांसाहारी भोजनगृहांमध्ये सर्वसामान्यांइतकीच गर्दी जरा उच्च वर्गातल्या लोकांचीही असते, याचं कारण तिथे उपलब्ध असलेलं मांसाहारी पदार्थ आणि गोडाच्या पदार्थांचं वैविध्य. विशेषतः वेगवेगळे कबाब, बिर्याणी, हलीम, फिरनी, मालपुवा यांना फार मागणी असते. आता बरेच जण तिथल्या आठवणी काढत मनातल्या मनात मिटक्या मारत असतील.

पण सर्वसामान्य ते उच्च मध्यमवर्गीय लोक हमखास आढळायचे ते इराणी रेस्तराँत. पूर्वी ही मुंबईत पावलोपावली आढळत. तिथला बनमस्का आणि कटींग किंवा नुसताच कटींग घेऊन तास न् तास लोक बसत. विशेषतः तथाकथित इंटेलेक्चुअल लोकांचा तो अड्डाच असे. पण ज्यांना जेवणावर फार वेळ किंवा पैसा खर्च करायचा नसे त्यांच्यासाठी तिथे खिमा पावसारखे झटपट पदार्थ असत. काही ठिकाणचं पुडींग, मावा केक हे प्रसिद्ध असे. अजूनही मरीन लाइन्सल कयानी, चर्चगेटला स्टेडियम वगैंरेसारखे जुने इराणी तग धरुन आहेत. आणि  अजूनही सर्व आर्थिक स्तरातले, सर्व धर्मांचे लोक त्यांना उदार आश्रय देत असतात.

बनमस्का

आमच्या कार्यालयातले एक नियमित हजर असणारे सहकारी अचानक वरचेवर रजा घेऊ लागले. मानव संसाधन विभागात काम करीत असल्याने अशा सहकाऱ्यांशी बोलून त्यांची काही समस्या असल्यास त्यांचं समुपदेशन करणं, त्यांना मदत करणं हा माझ्या कामाचा भाग असला तरी ते मला मनापासून आवडे. बोलता बोलता त्यांनी कारण सांगितलं. त्यांना मधुमेहाचा त्रास होता. मी म्हटलं,”अहो एव्हढं घाबरायचं काय त्यात. आता त्यावर औषधं आहेत. शिवाय योग्य आहार आणि व्यायाम यांनी तो नियंत्रणात रहातो.” “पण म्याडम, अहो मी पोतंभर जांभळाच्या बियाची पूड खाल्ली. तुम्हाला सांगतो पोतंभर मेथीची पूड खाल्ली. आपल्या ब्यांकेच्या डॉक्टरने दिलेली औषध् खाल्ली. काही फरकच नाही बघा.” असं सांगत बसले. शेवटी गप्पा मारता मारता बरं न होण्याचं खरं कारण बाहेर पडलं. “म्याडम, मला ना बनमस्का फार आवडतो बघा. घरून मस्कापाव खाऊन निघतो. मग चर्चगेटला आपलं ते इराण्याचं हाटेल आहे का (स्टेडियम रेस्ताँरा) त्याने मला पाहिलं की तो बनमस्क्याची प्लेट तयारच ठेवतो. मग ऑफिसात आलो की कँटीनला पुन्हा मस्कापाव खातो. नि मग फक्त संध्याकाळी एकदा खातो.” बनमस्का तुम्हाला कितीही आवडत असला तरी तो तुमचं काय नुकसान करून देऊ शकतो हे पद्धतशीर पटवल्यावर त्यांनी तो कमी करायचं वचन दिलं. हळूहळू त्यांचा मधुमेह आटोक्यात आला. हे सांगायचं कारण असं कि मलाही बनमस्का त्यांच्यासारखाच आवडतो. अर्थात योग्य आहाराच्या चौकटीत बसत नसल्याने मी तो फारसा खात नसले तरी मधूनच कधी तरी हुक्की येतेच. बनमस्क्याशी माझ्या बऱ्याच आठवणी जोडलेल्या आहेत.
लहानपणी आमच्या चाळीत एक दहा अकरा वर्षांचा मुलगा दारावर भीक मागायला येई. तो एक गाणं म्हणे. ते असं.
माझी लाडाची, लाडाची बायको ।
पावबरोबर मस्का खाते, भाकर म्हंते नको नको ।। माझी लाडाची बायको।।
आम्ही पुन्हा पुन्हा ते गाणं त्याला म्हणायला लावीत असू. आमच्या बाबीकाकांकडे मी गणपतीची मूर्ती बनवायला शिकायला जात असे. तेव्हा बाबीकाका नुकतेच नाश्ता करीत असत व तो साखर घातलेल्या दुधासोबत मस्कापावचा नाश्ता आम्हालाही मिळे. 
एक जरा दुःखी आठवणही आहे. पंडित नेहरू मुंबईत आले होते. त्यांच्यासमोर शाळकरी मुलांची नृत्ये होणार होती. आमच्या शाळेच्या गटात मीही होते. सोबत घरून डबा न्यायचा होता. माझ्या गिरगांवातल्या शाळेतल्या मैत्रिणींनी छान छान खाऊ आणला होता डब्यात. आई हॉस्पिटलात असल्याने घाईघाईत मला मात्र बनमस्का दिला होता बहिणीने. मला तो आवडेच. पण माझ्या डब्यातला बनमस्का पाहून मैत्रिणी आणि शिक्षिकांनी नाकं मुरडल्यावर मला मात्र कानकोंडं वाटलं.
मी आणि चंदर नोकरी करता करता शिकत असू. संध्याकाळी एम.ए.ची लेक्चर्स एल्फिन्स्टन महाविद्यालयात असत. काम आटोपून तिथे जातांना खूप भूक लागे. मग जवळच्या आर्मी अँड नेव्ही रेस्ताँरात एक चहा आणि एक बनमस्का दोघात मिळून घेण्याएव्हढे पैसे दोघांजवळ आहेत का याचा तपास आधी करावा लागे.
नंतर मात्र एकावेळी डझनभर बनमस्के घेण्याएव्हढे पैसे जवळ असले तरी कधी घेतले नाहीत. हे सर्व आठवायचं कारण हे की परवा हैदराबादला ओवी आम्हाला सार्वी नावाच्या बेकरीत घेऊन गेली. तिथे मी काचेआड तो पाहिला. मस्त मऊ, फुललेला बन, त्यावर साखर पेरलेली. काऊंटरवरच्या माणसाला विचारलं तर म्हणाला साध्या बनमध्ये आत लोणी आहे आणि तो बेक करतांना साखर पेरलीय. मी काही न बोलता तिथून हलले. थोड्या वेळाने चंदर एका कागदी पुड्यात तो घेऊन आला. मी म्हटलं,”अरे कशाला आणलास?” “मला तुझ्या डोळ्यात त्याची लालसा दिसली मला. अगं, खावं असं कधीतरी तुझ्या मते आरोग्याला घातक असलेलं काहीतरी अधूनमधून.” मग मागच्या बाजूला सार्वीच्याच कॅफेमध्ये आम्ही तो गरमागरम, नरमानरम बनमस्का चहासोबत फस्त केला.
जाता जाता सार्वीविषयी. तिथे सगळेच पदार्थ चविष्ट असले तरी कष्टकरी वर्गाला परवडतील अशा किंमतीत होते. चहा बारा रूपये. चिकन समोसा दहा रूपये. असंच सगळं. शिवाय हैदराबाद स्पेशल उस्मानीया बिस्कीटं. मुंबईच्या इराण्याकडे जमतात तसे लोक तिथे गप्पा झोडायला जमतात. आजूबाजूचे पत्रकारही तिथे पडीक असतात. आवडलंच मला. आर्मी अँड नेव्हीत गेल्यासारखं वाटलं बरेच दिवसांनी.