चालणारीची रोजनिशी-५

कालपासून कोकिळ पक्ष्याची कुहू ऐकू यायला लागलीय. आंब्याच्या मोहोराचा वास तर कधीपासूनच आहे वातावरणात. लस घेतल्यानंतर आज बऱ्याच दिवसांनी खाली चालायला उतरले. रस्त्यालगतच्या नारळीवर कधी कधी पाणकावळे (Cormorants) आपले पंख वाळवत बसलेले दिसतात, म्हणून आज तिकडे पाहिलं, तर ते गायब होते. म्हणून हिरमुसले. तर पुढे बागेत तांबडा चाफा पूर्ण फुलला होता. त्याचा लालसर रंग फार मोहक दिसत होता निरभ्र आकाशाच्या पार्श्वभूमिवर. थोडं पुढे गेल्यावर मागल्या भिंतीपाशी बहाव्याला सुंदर, सोनेरी, नाजूक घोस लटकतांना दिसल्यावर माझ्या आनंदाला उधाण आलं. माझी मैत्रीण शोभा भालेकरने (ही लेखिका आहे, नुकतंच तिचं पुस्तक प्रसिध्द झालं)  आमची गृहनिर्माण संस्था उभी राहिली त्या सुरुवातीच्या काळात हे झाड इथे लावलं. पण कुंपणाच्या भिंतीजवळ असल्याने त्याची काटछाट होत राहिली. आताही काही फांद्या उरल्यात. पण त्या तुटपुंज्या फांद्यांवरही बरेच घोस डोळ्यांना मेजवानी देत वाऱ्यावर डोलत होते. तिसऱ्या  फेरीच्या दरम्यान भारद्वाजाचा ऊप, ऊप आवाज घुमायला लागला. कुठेतरी लपून बसून आपल्या भरदार आवाजात हाका घालत होते साहेब. तेवढ्यात निळ्या रंगाचा खंड्या डावीकडून उडत चाफ्याच्या मागे असलेल्या एका निष्पर्ण झाडावर जाऊन बसला. आज मोबाईल जवळ नसल्याचं वाईट वाटलं. पण नंतर लगेच असं वाटलं की मोबाईल असता तर छायाचित्र घेण्याच्या नादात हे सगळं सौंदर्य डोळ्यांनी टिपण्याच्या आनंदाला मुकले असते.

एकूणच असं वाटलं की आज सगळे  माझं खास स्वागत करताहेत, “आलीस का? ये, ये. बऱ्याच दिवसांनी आलीस, म्हणून आम्हीही आलोय. येत रहा गं बयो, दिसत रहा.”

काय काय हरवलं?

काय काय हरवलं या कोरोनाच्या काळात मी? बागेच्या वळणावरचा बहावा पूर्ण फुललेला. चाहूल लागताच पळून जाणारी भारद्वाजाची जोडी, निवांत किलबिलत बसलेले बुलबुल. वाटेतल्या बोरांचा रस्त्यावर पडलेला सडा. झाडावरच्या कैऱ्यांचा ताजा वास. कडूनिंबाची सावली. मैत्रिणींशी गप्पा, त्यांचा स्पर्श, त्यांच्या सोबत खाल्लेला खाऊ, त्यांच्या फालतू विनोदांना खिंकाळून दिलेली दाद, बाजूला खेळणाऱ्या मुलांचं हसणंखिदळणंरडणंखेळणंमाऱ्यामाऱ्यापडणं, सोबत फेऱ्या घालणाऱ्या, समोरुन ख्यालीखुशाली विचारणाऱ्या, नमस्कारचमत्कार करणाऱ्या माणसांचा वावर, त्यांच्या घामाचा, अत्त्तरांचा, पावडरींचा वास, त्यांचे वादविवाद, रुसणीफुगणी, रस्त्यावरुन वाहणारी वर्दळ, अगदी अनोळखी माणसंही ओळखीची वाटायला लावणारी, थोडक्यात एक अख्खं जग जिवंत. हरवून गेलंय.