जॉर्जी, जिजू आणि बिर्याणी

जॉर्जी ही माझी महिला विशेष लोकलमधली मैत्रीण. तिचं लग्नानंतरचं नाव खरं तर नसीम. ती मूळची ख्रिश्चन असली तरी तिने लग्न हैदराबादच्या निज़ाम आडनावाच्या गृहस्थांशी केलं होतं. पण बरोबर प्रवास करणाऱ्या तिच्या जुन्या ओळखीतल्या मैत्रिणींसारखीच मीही तिला जॉर्जी म्हणायला लागले. एकदा आमच्या एका सिंधी मैत्रिणीचं जर्मनीतल्या एका व्यावसायिकाशी वयाच्या पन्नाशीनंतर लग्न ठरलं आणि ती तिथे जायला निघाली तेव्हा तिला निरोप देतांना आम्ही एक मेजवानी आयोजित केली. प्रत्येकीने काहीतरी पदार्थ करुन आणायचं ठरलं. त्यात जॉर्जीने आणलेली बिर्याणी इतकी चविष्ट होती की तिचं वर्णनही करता येत नाही. अशी बिर्याणी मी त्याआधी आणि नंतरही कधी खाल्ली नाही. पण ती जॉर्जीने केली नव्हती तर तिच्या नवऱ्याने केली होती. निज़ामसाहेब दिसायला चांगले, उंचनिंच होते, पण फार अबोल. जॉर्जी माझ्या शेजारच्या इमारतीत रहात असे त्यामुळे तिच्या आवडीचं काही देण्याच्या निमित्ताने येणंजाणं होई. तिला उकडीचे मोदक फार आवडत. ते कुठल्याही दुकानात ती कसेही मिळाले तरी वेड्यासारखे घेई. म्हणून मी केले की तिला नेऊन देत असे. जॉर्जीला फारसा स्वयंपाक येत नसावा. ती सांगे की तिला फक्त चपात्या करता येतात आणि मासे तळता येतात. पण ही एक गोष्ट मात्र मी स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलेली आहे की तिला घरी आल्यावर ताजं, गरमागरम अन्न मिळत असे. जिजू (ओळख नीट झाल्यावर मी निज़ामसाहेबांना जिजू म्हणायला लागले. मी जिजू अशी हाक मारीत असे अशी ती एकमेव व्यक्ती) आणि जॉर्जी यांच्या वयात बरंच अंतर होतं. ते केव्हाच निवृत्त झाले होते. पण जॉर्जी घरी यायच्या आधी साग्रसंगीत चविष्ट स्वयंपाक करुन टेबलावर टेबलक्लॉथ अंथरुन भांड्यांमध्ये सगळा गरम स्वैंपाक झाकून प्लेटस पुसून उलट्या घालून ठेवलेल्या असत. जॉर्जीबाई आंघोळ करून लगेच पानावर बसत.

जरा चांगली जानपहचान झाल्यावर मी जिजूंकडून बिर्याणीची पाककृती घेतली. लहान मुलाला सांगावं तशी (मी होतेच खूप लहान, मी नुकती पन्नाशी ओलांडलेली तर जिजूंनी पंचाहत्तरी) त्यांनी ती “अब क्या डालोगे? कैसे डालोगे?” असं विचारत ती माझ्याकडून घोटून घेतली. तेव्हा मला जमत असे. आता बऱ्याच वर्षांमध्ये केली नाही. नंतर जिजूही कर्करोगाने आजारी पडून गेले. त्यांच्या अखेरच्या दिवसातलं बोलणं फक्त त्यांच्या वेदनांसंबंधी होई. त्याबाबतीत मला काहीच करता येत नसे. आणि शेवटी त्यांच्या मृत्यूची बातमी आली. आता जॉर्जीकडेही बिर्याणी होत नाही. ती विकतच आणत असावी. पण जिजू हयात असतांना एकदा मी कामावरुन घरी परतत होते तेव्हा रात्री साडेनऊच्या सुमारास जॉर्जी पळत पळत वाण्याच्या दुकानाकडे निघालेली दिसली. तिला विचारलं काय झालं तर म्हणाली, “अरे, बिर्यानी बनाने का प्लान था, तुम्हारे जिजूने बोला था सामान ला के रखने के लिए, पर फिरभी कुछ भूल गयी।” “कहीं केसर और केवडा इसेन्स यें दोनो तो नहीं ना भूली?” मी विचारलं. “हाँ रे, बराबर पहचाना, तुझे कैसे पता?” मला माहीत होतं, कारण जिजूंप्रमाणेच केशराच्या काड्या आणि केवडा यांच्याशिवाय बिर्याणी करायला मलाही आवडत नाही.

केप टाऊन दैनंदिनी -५

आम्ही कुठेही गेलो की तिथल्या आठवडी बाजारात जायला फार आवडतं. अशा ठिकाणी कधी कधी फार वेगळं काही हाती लागतं. माणगांवच्या आठवडी बाजारात एकदा आम्हाला ओल्या काजूच्या टोपल्यांसोबत रानभाज्यांचे कधी न पाहिलेले प्रकार मिळाले होते. जुन्नरच्या आठवडी बाजारात आम्ही लाकडी काथवट शोधली पण नंतर आम्हाला हवी तशी काथवट आळ्याच्या जत्रेतल्या बाजारात मिळाली (हे जत्रेतले बाजारही फार मजेशीर असतात) . मध्ये वर्ध्याला गेलो असतांना तिथल्या आठवडी बाजाराच्या दिवशी तिथेच होतो, म्हणून बाजारात गेलो तर पावलोपावली रांगोळ्यांचे ठेले होते. अशा बाजारात हिंडलं की गावाबद्दल अधिक कळतं. अशीच संधि केप टाऊनमध्ये क्षितिजमुळे मिळाली. तिथेही शनिवारी आणि रविवारी आठवडी बाजार भरतो. जमिनीवर लाकडाचा भुस्सा टाकून तिथे शेतकऱ्यांना ठेले उभारून दिले होते. एका बाजूला खरेदी करून दमल्याभागल्या, भुकेल्या लोकांसाठी खाद्यपदार्थांचे ठेले आणि लोकांना आरामात बसून खाता यावं यासाठी खुर्च्या, मेजं लावली होती. तिथे चक्क शाकाहारीच नव्हे तर दुग्धउत्पादनं न खाणाऱ्या लोकांसाठीही पदार्थ होते. बाजारात तर विविध भाज्या, फळं, मांसाचे प्रकार, अंडी, घरी केलेले पाव, केक, लोणची, मुरांबे, वेगवेगळी रोपटी अशा सगळ्या गोष्टींचे ठेले होते. एका भाजीच्या ठेल्यावर मला चक्क भोपळ्याची फुलं मिळाली. त्यांची आम्ही घरी जाऊन भजी केली (क्षितिजकडे बेसन नव्हतं तर चक्क गव्हाचं पीठ वापरलं). माझ्या आवडत्या फुलांना पाहून तर डोळे निवले अगदी. या बाजारातल्या वस्तूंचे दर शेतकऱ्यांनीच ठरवलेले दिसत होते. (नक्की माहीत नाही). सगळं छान होतं, पण तिथे वर्चस्व गोऱ्या लोकांचं दिसत होतं याचं जरा वाईट वाटलं.