रस्ता ३

आज मी बघत होते, समोरच्या इमारतीसमोरचं रगड्याचं दगडी पाळं रिकामं होत आलं होतं. माझ्या अगदी मनात आलं की केबिनच्या खिडकीत बसलेल्या रखवालदाराला हाक मारून सांगावं, माझी हाक इतक्या दुरून पोचली असती की नाही शंकाच होती, पण कशी कोण जाणे मनातल्या मनात मी मारलेली हाक ऐकू आल्यासारखा तो बाहेर आला आणि तीन बाटल्या पाणी त्यात ओतून निघून गेला. माझा जीव भांड्यात पडला.

बकऱ्या चारायला येणाऱ्या बाईकडून नेहमीच एकाददुसरी चुकार बकरी मागे रहाते, पूर्वी आम्ही बाकावर बसत असू तेव्हा कुणाच्या हाती तिला निरोप पाठवित असू. एकदा अशा मागे राहिलेल्या चुकार बकरीला भटक्या कुत्र्यांनी घेरलं तेव्हा लोकांनी अशीच तिची सुटका करुन ती बाई येईपर्यंत तिची राखण केली होती. आजही एक काळी आणि एक ढवळी अशा दोन बकऱ्या मागे राहिल्या होत्या. काही खायला मिळालं नसावं फारसं किंवा सवय म्हणून असेल त्यातली ढवळी बकरी कचऱ्यातला कागद खात होती. तेवढ्यात फाटकातून नेहमी तिच्या भल्याढमाल्या कुत्र्याला फिरायला नेणारी उच्चभ्रू बाई बाहेर आली. घाबरुन ढवळी बकरी तोंडातला कागद तसाच ठेवून सैरावैरा पळायला लागली. मग काळी बकरीही तिच्या मागे मागे पळायला लागली. इकडे उच्चभ्रू बाई लहान मुलाने तोंडात गोटी किंवा फुगा घातल्यावर आया जशा हातवारे करतात तसे हातवारे करीत बकरीला तोंडातला कागद टाकून द्यायला आरडाओरडा सुरु केला. बरं हे करतांना तिच्या हातातली कुत्र्याची साखळी तशीच असल्याने बकऱ्या अधिकच घाबरून पळायला लागल्या. त्या पळापळीत ढवळीच्या तोंडातला कागद पडून गेला. त्या बाईच्या दुसऱ्या हातात काहीतरी खायची वस्तू -बहुधा बिस्कीट होतं. ती बकऱ्यांनी ते बिस्कीट खावं म्हणून एका हाताने कुत्र्याला खेचत बकऱ्यांजवळ सरकतांना पाहून बकऱ्या आणखी घाबरून खाजणात पळून गेल्या. बाई नाईलाजाने पुन्हा फाटकात शिरली.

रस्ता पुन्हा नेहमीसारखा झाला.

रस्ता २

समोरच्या इमारतीचा रखवालदार रोज फाटकाजवळ ठेवलेलं जुन्या रगड्याचं दगडी पाळं पशुपक्ष्यांना पिण्यासाठी पाणी भरुन ठेवत असतो हे मला माहीत होतं. रोज त्यात भटके कुत्रे, पक्षी पाणी पितात. कावळे आंघोळ करतात. आपण गडबडगुंडा आंघोळीला कावळ्याची आंघोळ म्हणत असलो तरी कावळा फार नीट निगुतीने आंघोळ करतो, ती पहाण्याजोगी असते. आम्हीही पक्ष्यांसाठी पाणी ठेवत असल्याने अनुभवलंय की अशा पाण्यात पक्ष्यांनी चोचीतून आणलेलं काय काय पडलेलं असतं त्यामुळे ते भांडं स्वच्छ धुवावं लागतं. आज त्या रखवालदाराला मी फार नेटकेपणाने ते रगड्याचं जड पाळं खरवडून खरवडून घासतांना पाहिलं. त्याने ते घासल्यावर दोन तीनदा स्वच्छ धुवून घेतलं. मग त्यात तीनचार बाटल्या स्वच्छ पाणी भरुन ठेवलं.

रस्त्यावर तशी या काळातही वर्दळ असते. रोजचे चालायला जाणारे शूरपणे चालत असतात. त्यांनी तोंडावर मुसकी (मास्क) बांधलेली असतात. तरुण, सुंदर मुली रंगीबेरंगी कपडे घालूनच नव्हे तर रंगीबेरंगी मुसकी बांधून कॅटवॉक करत असल्याच्या आविर्भावात चालत असतात.  दोनअडीच वर्षांपूर्वी धुळीचा आणि परागकणांचं वावडं असल्याने दम्याचा त्रास व्हायला लागल्यावर डॉक्टरने मला बाहेर फिरतांना मुसकं बांधायला सांगितलं तेव्हा सुरुवातीला मला तर कसंतरीच वाटे, पण पहाणारेही विचित्र नजरेने पहात. काहींना मला कर्करोगासारखा काही आजार असावा असं वाटे आणि ते माझ्यापासून अंतर राखून रहात. काही महिन्यांपूर्वी ओवीने माझ्यासाठी काळ्या रंगाचं एक मुसकं मागवलं त्यात मला नीट श्वास घेता येई. पण माझी मैत्रीण सेलीन म्हणायची तू ते लावू नकोस मला तुझ्याकडे पहायला भीती वाटते (चंदरला मी ते घातल्यावर डार्थ वेडरसारखी दिसतेय असं वाटे). पण तरीही मी ते वापरत असे. कोरोनाची बातमी पसरल्यावर लोक हळूच माझ्याकडे चौकशी करायला लागले की हे  कुठून घेतलं. स्टेला नावाच्या मैत्रीणीने तर चिडवलंच, “तुला भविष्यातलं कळतं वाटतं, इतक्या आधीपासूनच हे वापरतेयस.” (माझ्या २०१७ च्या एका रांगोळीतली मुलगीही मुसकं बांधलेली होती.)  आता सगळे लोक मुसकं वापरतांना पाहून मला गंमत वाटतेय थोडीशी.

तर अशा मुसकं बांधून चालणाऱ्यात भाजी, किराणा आणणाऱ्यांचीही भर होतीच. ही सगळी  वर्दळ सूर्यास्ताच्या दरम्यान जरा कमी झाल्यावर दोन पोलीस एका दुचाकीवर बसून आले. दोन पोरांना पकडलं. एकाला शिक्षा म्हणून दुचाकीच्या मागच्या भागाला पकडून पळायची शिक्षा दिली. पण त्यांनी दुचाकी फार हळूच चालवली. मग दुसऱ्याला तर फक्त दम मारला आणि दोघांनाही सोडून दिलं.

कोणाच्या पोटात कुणाकुणासाठी माया असते काय माहीत!