तरुणपणातल्या धडपडी

तरूणपणी आपण जगण्यासाठी जी धडपड करतो, त्यातून बराच अनुभव गाठीशी येतो. मीही माझ्या तरूणपणी अशीच धडपडत होते. नवव्या इयत्तेत असल्यापासून ते इंटर उत्तीर्ण होईपर्यंतची पाच वर्षं मी चारूशीला गुप्ते ह्या लेखिकेची लेखनिका आणि चिटणीस म्हणून काम केलं. एस.एस.सी.पर्यंत मी काळाचौकीहून मलबार हिलवरल्या त्यांच्या घरापर्यंत रोज येजा करीत असे. एस.एस.सी. नंतर मी त्या ज्या जयहिंद महाविद्यालयात शिकवत असत तिथेच प्रवेश घेतला आणि त्याआधीपासूनच त्यांच्या घरी राहून काम करायला सुरुवात झाली. मी त्यांचा मुलगा प्रणय ( हा फार मोठा वार्ताहर होता, त्या वेळी तो न्यूयॉक टाइम्समध्ये काम करत होता) ह्याच्या खोलीत राहत असे. त्याच्या खोलीतून समुद्र दिसत असे आणि त्याच्या पुस्तकांचा संग्रह फार चांगला होता. ह्या दोन गोष्टींमुळे मी तिथे जरा रमले.

बाई फार स्थूल होत्या. त्यामुळे त्यांना बऱ्याच व्याधी होत्या. त्यांना अधून मधून चक्कर येत असे. त्यामुळे कुणीतरी सतत त्यांच्या सोबत रहावं लागत असे. खरं तर मी त्यावेळी छत्तीस किलो वजन असलेली मुलगी. बाईंना चक्कर आली की आधार देणंही शक्य नव्हतं. पण सुदैवाने त्यांना ते आधीच जाणवत असे. मग आम्ही कुठेतरी बसत असू चक्कर जाईपर्यंत.

त्या सेन्सॉर बोर्डाच्या सदस्य होत्या. त्यामुळे त्या बैठकांना जात तेव्हा मला सोबत घेऊन जात. मुख्य चित्रपटगृहात मला एखादा चित्रपट पहात बसवून त्या छोट्या सभागृहात बैठकीला जात. त्या काळात मी बरेच चित्रपट आधी शेवट मग सुरुवात अशा पद्धतीने पाहिले. एकदा असाच शेवट पाहिलेला असल्याने मी बाहेर येऊन बसले आणि चित्रपटाचा नायक कबीर बेदी “So, how did you like it?” असं विचारत आला. मी त्यावेळी बिनधास्त असल्याने कुठलंही दडपण न घेता नाक उडवत बरा होता असं उत्तर दिलं. आमच्या घरात मुलांनी काय पहावं आणि काय पाहू नये ह्याचे दंडक असल्याने एरव्ही मला हे चित्रपट पाहता आले नसते हेही खरं.

त्या काळात एका बायकांच्या मासिकासाठी बाईंनी बऱ्याच गायक, संगीतकारांच्या मुलाखती घेतल्या होत्या. त्या सगळ्या वेळी मी त्यांच्यासोबत असे. आशा भोसले, सुमन कल्याणपुर, वाणी जयराम, जयदेव, सी. रामचंद्र आदींचा त्यात समावेश होता. त्यापैकी वाणी जयराम त्या वेळी वरळीला एका जुनाट इमारतीतल्या पहिल्या मजल्यावर राहत. पहिला मजला असला तरी जिने उंच होते आणि काळोख होता. त्यामुळे बाई पहिल्या वेळी कशाबशा आल्या. नंतर उरलेली मुलाखत घेण्याचं काम त्यांनी माझ्यावर सोपवलं. मग ठरलेल्या वेळी बाईंनी दिलेली प्रश्नावली आणि ध्वनिमुद्रणयंत्र घेऊन मी वाणीताईंकडे गेले. त्या तेव्हा अगदी साधेपणाने राहत. घरात नोकरचाकर नव्हते. त्यामुळे त्यांनीच दार उघडलं आणि त्यांच्या हातचा डोसा आणि कॉफी ह्यांचा आस्वाद घेत मी मुलाखत पूर्ण केली. सी. रामचंद्रही शिवाजी पार्कला एका जुन्या इमारतीच्या गच्चीवरल्या घरात राहत. तिथे बाईंना जाणं शक्यच नव्हतं. त्यामुळे तिथेही प्रश्नावली आणि ध्वनिमुद्रण यंत्र घेऊन मी संध्याकाळी गेले. त्यांच्या पत्नीने दार उघडलं. पण सी. रामचंद्रांनी मला अगदी स्पष्टपणे सांगितलं,”संध्याकाळी मी कुणाला भेटायच्या स्थितीत नसतो. तुम्ही उद्या सकाळी या.” दुसऱ्या दिवशी सकाळी गेल्यावर मात्र ते छान प्रसन्न होते आणि मुलाखत चांगली झाली. सुमन कल्याणपुरांकडे गेलो होतो तेव्हा बहुधा दिवाळी होती. आम्ही गेलो तेव्हा त्या दिवाणखान्यातल्या एका प्रचंड समईभोवती रांगोळी काढत होत्या. ती रांगोळी इतकी सुंदर होती की नजर सतत तिथे वळत होती. सगळ्या ठिकाणी छान आगतस्वागत होई. मंगेशकर कुटुंबियांबाबत मात्र अंतर राखून वागविल्याचा अनुभव आला. खरं तर बाईंचा आणि त्यांचा परिचय फार जुना होता, तरीही असा अनुभव यावा हे नवल. हृदयनाथांच्या बाबतीत मात्र वेगळा अनुभव एकदा आला होता. मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयाच्या सभागृहात एकदा त्यांचा कार्यक्रम होता. प्रचंड गर्दीमुळे माझ्या धाकट्या बहीणीला चक्कर आल्यावर त्यांनी स्वतःजवळचं तांब्याभांडं घाईघाईने खाली पाठवलं होतं.

बाईंबरोबर असतांना कित्येक मोठे राजकीय नेते, अभिनयक्षेत्रातली माणसं, कवी, लेखक ह्यांच्याशी संबंध येई. अगदी तत्कालीन मुख्यमंत्री वसंतराव नाईक ह्यांच्या बंगल्याच्या मागच्या बागेत खुद्द वत्सलाबाईंनी आम्हाला जेवण वाढल्याची आठवण आहे. राजेश खन्ना त्यांचा विद्यार्थी होता. त्याने एकदा आमच्यासाठी गाडी पाठवली होती. त्या गाडीत गीतकार कपिलकुमार होते. त्यांनी अनुभव ह्या चित्रपटासाठी लिहिलेली गीतं मला आवडत असत. बाईंनी ओळख करून देतांना ही हिंदीतही लिहिते असं सांगितल्यावर त्यांनी माझ्या काही कविता ऐकून चांगलं लिहितेस, लिहित रहा असं सांगितल्यावर बरं वाटलं.

माझं मुख्य काम लेखनिकेचं असलं तरी इतर अनेक कामं करावी लागत. जसं की रामकुमार भ्रमर ह्यांची तमाशावर आधारित एक कादंबरी होती. तिचं भाषांतर बाईंनी करायला घेतलं. खरं तर त्यांचं हिंदी अगदी बेतास बात होतं. मी आठवीत असतांनाच कोविदपर्यंतच्या परीक्षा दिल्याने माझं हिंदी तसं चांगलं होतं. त्यामुळे त्या भाषांतरात मला त्यांना बरीच मदत करावी लागली. त्या आनंदबन नावाचं एक त्रैमासिक लहान मुलांसाठी प्रकाशित करीत असत. एके काळी संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीतल्या त्यांच्या भाषणांमुळे त्या फार लोकप्रिय होत्या. तेव्हा बरेच मोठे मोठे लोक त्या त्रैमासिकासाठी साहित्य देत असत. पण नंतर त्यांच्या लोकप्रियतेला ओहोटी लागल्यावर फारसा मजकुर मिळत नसे. मग काहीतरी भर घालावी लागे. त्या इंग्लंड, अमेरिका आणि रशियाची वारी करून आल्या होत्या. तिथून येतांना त्यांनी लहान मुलांसाठी बरीच पुस्तकं आणली होती. त्यातल्या एखाद्या पुस्तकातल्या लोककथेचं किंवा परीकथेचं भाषांतर मी अशा वेळी अंकासाठी करीत असे. माझ्या नावावर आधीच काही मजकुर असेल तर मग हे भाषांतर टोपण नावाने प्रसिद्ध होई. आभा त्रिवेदी हे एक टोपणनाव आठवतं कारण ते मी बरेचदा वापरत असे. बाकी जी काही मनात येतील ती नावं वापरली जात. माझा मधुकर मोहिते नावाचा मित्र अंकासाठी लिहित असे. त्यामुळे एक भाषांतर तर त्याच्याच नावावर खपवलं होतं. त्या काळात बाई वरचेवर आजारी पडत.  कधी कधी बाईंना बरं नसलं तर संपादकीयही लिहावं लागे. अंकातला मजकुर आला की छापखान्यातच बसून तिथल्या तिथे प्रुफ रीडिंग करून मी देत असे. छापखान्यातल्या लोकांना इतकी लहान मुलगी प्रुफ रीडिंग करते ह्याचं फार कौतुक वाटे आणि ते माझ्यासाठी चहा बिस्किटं मागवीत. अंक तयार झाला की वेष्टनावर पत्ते डकवून, मग अंक वेष्टनात गुंडाळून दोन भल्या मोठ्या थैल्यांमध्ये भरून जीपीओत जाऊन दिले की मगच माझं काम संपत असे.

बाई लहान मुलांसाठी एकांकिका स्पर्धाही आयोजित करत. वैद्य नावाचे मंत्रालयातले एक गृहस्थ त्यांना मदत करत असले तरी पत्रव्यवहार करणं, आयत्या वेळी पडणारी कामं करणं हेही माझं काम होतं. बाई विविध वृत्तपत्रांसाठी, नियतकालिकांसाठी लिहित. ते लेख त्या त्या कार्यालयात नेऊन देणं हेही माझं काम असे. त्या खुशाल मला पत्ता देऊन मुंबईभर कुठेही पाठवीत. पोस्टमन, पोलीसदादा ह्यांना पत्ता विचारत मी शोधत जाई. पण माहीत नसलं की पंचाईत होई. एकदा फ्री प्रेस जर्नलचं कार्यालय शोधता शोधता मी शेअर बाजारात पोचले. तेव्हा शेअर बाजारात बायका नसत. त्यामुळे एक तरुण मुलगी आलीय म्हटल्यावर जोरजोरात आरडाओरडा करणारे सटोडिये काही काळ स्तब्ध होऊन मागे वळून पहात राहिले. माझी चूक उमगून तिथून पळाले. नंतर अर्थात ते कार्यालय मला सापडलं. पण ह्या भटकंतीमुळे मला मुंबई चांगलीच माहीत झाली. बेस्टचे बरेचसे मार्ग मला पाठ असत.

एकदा बाईंकडे इंडिया अब्रॉडशी संबंधित वॉल्टर किंवा तसंच काहीसं नाव असलेला अमेरिकन तरुण राहायला आला. तो मुंबईत बसने प्रवास करीत असे. त्याला कुठेही जायचं असलं की हा साडेसहा फूट उंचीचा माणूस कमेरत वाकून मला विचारी, “Chyubangi, how do I go to fountain?” मग मी त्याला कुठून कुठली बस घेऊन कसं जायचं ते समजावीत असे. आमचा हा संवाद ऐकण्याजोगा आणि बघण्याजोगाही असे. गुप्त्यांच्या घरात दारूला मनाई असल्याने त्याच्यासाठी कोरा चहा बाटलीत भरून फ्रीजमध्ये ठेवण्याचं आणि उकडलेल्या भाज्या आणि मासे करण्याचं कामही माझ्या गळ्यात होतं. त्याने मी रांगोळी काढतांना माझं एक रंगीत छायाचित्र घेतलं होतं आणि ते तिथे प्रसिद्धही केलं होतं. ते अजूनही घरात कुठेतरी आहे.

मी बी.ए.च्या पहिल्या वर्षाला जयहिंद महाविद्यालय सोडून एल्फिन्स्टन महाविद्यालयात प्रवेश घेतला आणि बाईंची नोकरी सोडली. अर्थात त्यांच्याकडल्या पाच वर्षांनी मला बराच वेगवेगळ्या प्रकारचा अनुभव दिला, जो आयुष्यात पुढे फार उपयोगी पडला, बाईंचं हे ऋण माझ्यावर नेहमीच राहील.

एल्फिन्स्टनमधल्या आमच्या विजया राजाध्यक्ष आणि सरोजिनी शेंडे ह्या दोन्ही गुरुंना माझी परिस्थिती माहीत असल्याने त्या दोघीही मला काही कामं मिळवून देत. शिवाय मी शिकवण्याही करीत असे. त्यामुळे माझा खर्च भागत असे. एकदा राजाध्यक्षबाईंनी यंदे नावाच्या एका गृहस्थांशी ओळख करून दिली. त्यांनी पाणी शुद्ध करणारं क्लोरीवॅट नावाचं उत्पादन तयार केलं होतं. त्याकाळी मिनरल पाणी किंवा झिरोबी वगैर नसल्याने ते खपतही होतं. पण त्यांना ते विकण्यासाठी दारोदार जाणाऱ्या विक्रेत्यांना तयार करण्यासाठी तसंच महिला मंडळं आणि कार्यालयांमधून त्याविषयी माहिती देऊन विक्री करण्यासाठी कुणाची तरी गरज होती, त्यासाठी त्यांनी मला नेमलं. मी माझ्या ओळखीपाळखीतल्या आणि नात्यागोत्यातल्या काही तरूणींना तयार केलं. असं फिरतांना काय सावधगिरी घ्यायची ते मला गुप्तेबाईंकडच्या अनुभवामुळे माहित होतंच. ते त्यांना शिकवलं. सुरुवातीला मी त्यांच्यासोबत वस्त्यांमधून जात असे. काही लोक शांतपणे नुसतंच ऐकून घेऊन नकार देत, काही बाटल्या विकत घेत. काही म्हणत आम्ही तुरटी वापरतो, त्याने शुद्ध होतं पाणी. लालबाग, भायखळा, कुलाबा इथल्या पारसी लोकांच्या वसाहतींमध्ये वेगळा अनुभव येई. एकतर घरांमध्ये फक्त वृद्ध असत. दुसरं म्हणजे त्या दरम्यान अशा एकट्या वृद्धांचे खून होण्याच्या घटना वाढीला लागल्याने दहशत होती. त्यामुळे ते दारच उघडत नसत. आतूनच “कोण छो?” विचारीत. ह्यावर मी एक शक्कल काढली. सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांना गाठून त्यांच्या वार्षिक सभेच्या किंवा कार्यक्रमाच्या वेळी दहा मिनिटं मला देण्याची विनंती केली. त्याचा खूप उपयोग झाला. महिला मंडळांमध्येही त्यांच्या कार्यक्रमाच्या मध्यंतरात मी उत्पादनाविषयी बोलत असे. तिथेही चांगला खप होई. ह्या भटकंतीत कुठेही भूक तहान लागली तर उपाहारगृहात एकटीने जाऊन खाण्याची सवय लागली. त्यामुळे पुढच्या आयुष्यातही कुणाच्या सोबतीवाचून माझं अडत नसे. दोन वर्षं हे काम मी केलं. त्यानंतर एम.ए.ला असतांना जनता साप्ताहिक आणि नंतर बँकेत नोकरीला लागले आणि ह्या सगळ्या धडपडींना पूर्णविराम मिळाला. पण ह्या धडपडींमुळे मी बऱ्याच बाबतीत स्वावलंबी झाले हे मात्र खरं.

कलापथि

पद्मा खरं तर आमच्या मैत्रिणीची सरस्वतीची भाची. पण लहानपणापासून बहिणीकडे वाढलेल्या सरूची ही भाचरंच सर्वस्व. त्यामुळे पद्मा सरूबरोबर पर्यायाने आमच्यासोबत नेहमी असे. तर तिच्या लग्नासाठी आमंत्रण आलं आणि पालक्कड किंवा पालघाटजवळच्या कलापथि गावी जायला तिथून सर्वात जवळ असलेल्या कोय्यम्बत्तुर ( सरू कोईमतुरचा असाच उच्चार करते आणि विमानतळावरही तो तसाच लिहिलेला आढळला) विमानतळावर दाखल झालो. आम्हाला न्यायला आलेले फक्रुण्णा भलतेच चटपटीत निघाले, आम्ही त्यांना शोधायच्या आधीच त्यांनी आम्हाला गाठलं. नाव फक्रुद्दीन. पण “खाली नाम से कैसे बुलानेका?” म्हणून सरू त्यांना फक्रुण्णा म्हणत असे आणि आम्ही ही त्या तरूणाचं तेच नामकरण करून टाकलं. त्यावरून आमच्या ओवीची गंमत आठवली. बंगळुरूच्या सवयीने आम्ही हैदराबादला रस्ता विचारतांना तिने अण्णा अशी हाक मारली तर कुणीच बघेना. मग तिच्या मित्राने तिला भैय्या किंवा भाई म्हणून हाक मारायला सांगितलं तर जादू झाल्यासारखा प्रतिसाद मिळाला. तर फक्रुण्णांनी आमची गाठोडी कलापथि गावात आणून टाकली. आमच्या जाण्याचं त्या सर्वांना एव्हढं अप्रुप वाटत होतं कि आमची अगदी बऱ्याच वर्षांनी माहेरी आलेल्या मुलींसारखी बडदास्त ठेवली गेली. कुठल्याही कामाला हात लावणं तर सोडाच आमच्या तिथल्या बंधुंनी अगदी आमची अंथरूणंही आम्हाला घालू दिली नाहीत. खाण्यापिण्याचं आणि भ्रमणध्वनिवरून धडाधड छायाचित्र पाडण्याचं काम फक्त उरलं. तेव्हा ते पचवायला आम्ही गावात फेरफटका मारायला लागलो.

उतरत्या कौलांची घरं गल्लीच्या दुतर्फा होती. बाहेरून ती एकसारखी दिसली तरी आतून घरमालकाच्या सांपत्तिक स्थितीनुसार वेगवेगळी होती हे आम्ही अनुभवलं. सरूचं घर आणि आम्ही शेवटल्या रात्री जिथे राहिलो ती दोन्ही घर पारंपरिक मल्याळी घरं होती. लाकडी खांबांवर छताची चौकट बांधलेली, आडव्या काळ्या लाकडी तुळया. सरूच्या घरात मोठ्या खांबासारखं काहीतरी होतं कोपऱ्यात. विचारलं तर कळलं कि छतावरून येणारं पावसाचं पाणी गोळा करून साठवण्याची सोय होती. एक प्रकारचं वॉटर हार्वेस्टींगच ते. पण त्याच गल्लीच्या टोकाशी आम्ही दोन दिवस राहिलो ते घर म्हणजे एक आधुनिक बंगला होता.

बाहेरून या सर्व घरात एक साम्य होतं. ते म्हणजे प्रत्येक घराच्या दरवाजाजवळ दोन्ही बाजूला बसण्यासाठी केलेले ओटे आणि रांगोळी काढण्यासाठी बसवलेले काळे चौकोनी दगड. दोन्ही दिवसात गावात तरूण मुलांचा वावर फारसा दिसला नाही. वयस्कर माणसंच जास्त होती. तरूण मुलं बहुधा शिक्षण किंवा नोकरीसाठी बाहेरगांवी असावीत. नवऱ्याला लाडाकोडाने हाताला धरून नेणाऱ्या, त्याची काळजी वहाणाऱ्या (त्यात सरूची आईही होती) म्हाताऱ्या अधिक होत्या. मग या नवनवीन रांगोळ्या कोण एव्हढ्या उत्साहाने काढतं हे माझं कुतूहल काही शमलं नाही.


कलापथि ही जवळच्या तामिळनाडूतून स्थलांतरित झालेल्या तामिळी ब्राह्मणांची पहिली वस्ती (अग्रहारम्). सततच्या आगी, जीवित आणि मालमत्तेची हानि या सगळ्याला घाबरून त्यांनी आपल्या रक्षणासाठी गणपतीचं मंदिर बांधलं. हे गांव दक्षिण काशी म्हणून ओळखलं जातं. इथले ब्राह्मण विद्वान पंचक्रोशीतली धर्मकार्य करीत. (त्यामुळेच कि काय आपल्याकडे कविसंमेलनात जसे श्रोत्यांपेक्षा व्यासपीठावर कवी संख्येने अधिक असतात तसे पद्माच्या लग्नात दोन्हीकडचे पुरोहितच जास्त दिसत होते.)
गावाची रचना साधीच. काटकोनात वळणाऱ्या छोट्या गल्ल्या. प्रत्येक गल्लीच्या तोंडाशी किमान एक देऊळ. मला केरळ आणि पश्चिम बंगाल या साम्यवादी विचारसरणीसाठी ओळखल्या जाणाऱ्या राज्यांचं काही कळत नाही या बाबतीत. केरळमधले डाव्या विचारसरणीचे पुढारीही कपाळावर भस्माचे पट्टे मिरवतात. बहुधा त्यांनी आपला साम्यवाद आणि धर्म यांचे वेगवेगळे कप्पे केले असावेत. काही दुकानं. एक दोन ठिकाणी दुकानावर पाटी दिसली ‘Brahmin Products’. म्हणून कुतूहलाने पाहिलं तर पूजेच्या साहित्यासोबत पापड, कुरडया, लाडू असे पदार्थ दिसले. हे बहुधा ‘सोवळ्यातले’ असावेत. एकदा आमच्या ओवीने असंच चेन्नईवरून अय्यंगार ब्राह्मणांनी केलेले पापड आणले होते. संध्याकाळी ओट्यांवर म्हातारी माणसं उदासवाणी बसलेली असत. महाराष्ट्रातल्या एखाद्या खेड्यात नवीन माणसं दिसल्यावर “ काय, कोण गावचं पाव्हणं म्हणायचं?” “खयसून इलास?” इत्यादी चौकशा होतात तशा इथे कुणी करीत नव्हतं. हे उदासवाणं, झोपाळू गाव आणि त्या शांत गल्ल्या माझ्या नेहमीच स्मरणात राहतील.


न्याहारीला इडली, वडे, डोसे, इडीअप्पम, तोड्याची जिलेबी अशा सर्व दाक्षिणात्य पदार्थ पाहून आम्हाला जरा भीतीच वाटली कि न्याहारी अशी तर जेवणात काय असेल. पण जेवण म्हणजे आपल्या ओणम् साद्याचा छोटा अवतार होता. अवियल, काळण, इस्ट्यू, पापडम्, सांबार, भात, रस्सम् या साऱ्यासोबत दोन प्रकारची पायसम् होती. त्यात माझ्या आवडीचं अडापायसम् होतं.

लग्न अगदी साधेपणाने कोणत्याही बडेजावाशिवाय पार पडलं. छोट्या गावात होतं त्याप्रमाणे वधूची तयारी घरातल्या बायकांनी केली. साध्याशा पण स्वच्छ आणि हवेशीर कार्यालयात विवाहसोहळा पार पडला. महाराष्ट्रात मंगलाष्टकं झाल्यावर वाजवा रे वाजवा अशी हाकाटी होते आणि मग वाजवायला सुरूवात होते ती वरातीपर्यंत. इथे गंमत म्हणजे प्रत्येक विधि पार पडल्यावर खूण केली जाई मग तब्बल दोन मिनिटं घडघडघड वाजत राही. मग पुढल्या विधीपर्यंत शांतता. वरातीतही नाचकाम, बँडबाजा काही नाही.

लग्नसोहळा पार पाडल्यावर सरूने फक्रुण्णाला दिमतीला देऊन आम्हाला जवळपासची ठिकाणं पहायला पिटाळलं. गेल्या महिन्यात मलमपुझ्झा, अलमत्ती आणि राधानगरी अशी तीन वेगवेगळ्या राज्यातली धरणं पहायचा योग होता. अलमत्तीला फक्त धरणाचा थगारा बघता येत होता. तिथेही धरणाजवळ अशाच आधुनिक बागा, संगीताच्या तालावर नाचणारी कारंजी होती. हे सगळं नयनरम्य होतं. लोकांना तिथे मजेत वेळ घालवता येत होता. राधानगरीला यातलं काहीही नव्हतं. धरणाची छायाचित्रच घ्यायला काय भ्रमणध्वनि, कॅमेरा काहीही घेऊन जाता येत नव्हतं. वर धरणाचं दृश्य पहायला गेलो तिथे उभं रहायलाही धड जागा नव्हती. पण तरीही मला राधानगरी आवडलं. तिथं असीम शांतता होती. समोर धरणाचं सुंदर दृश्य होतं आणि अलिकडे शेतीभातीचं नैसर्गिक दृश्य.
दुसऱ्या दिवशी आम्ही पुन्हा कोय्यम्बत्तुरला पोचलो परतीच्या प्रवासासाठी. तिथे अजून फार प्रमाणावर गगनचुंबी इमारती नाहीत. छोटी टुमदार घरं अजूनही आहेत. तमिळ आणि केरळी माणसांना श्वासाइतकी आवश्यक अशी मंदिरं आहेत. कार्यालयात जातानांही भरजरी साड्या, दागिने आणि हो फुलांचे मोठे गजरे माळणाऱ्या दाक्षिणात्य सुंदरी आहेत. या तीन दिवसात आमची ही फुलं माळायची हौस भागली. तिथला मोगरा काही वेगळाच आणि मल्लिगे तर छानच. एकूण एक लक्षात रहाण्याजोगी भटकंती झाली.