केप टाऊन दैनंदिनी -४

केप टाऊनमध्ये असुरक्षितता आहे असं ऐकलं होतं. एटीएममध्ये पैसे काढतांना, रस्त्यावर वावरतांना खिसा, पाकीट सांभाळण्याच्या सूचना अनेकांनी दिल्या होत्या. रात्री अपरात्री फिरू नका असा सल्लाही मिळाला होता.

साधारणपणे आमचं हिंडणं फिरणं दिवसा सहासात वाजेस्तोवर आटपत असे. तिथे सातआठ वाजताही चांगला प्रकाश असल्याने काही वाटत नसे. फिरतांना भीक मागणारे नेटीव दिसत असत. आपल्या इथल्यासारखी सिग्नलवरही मंडळी कोंडाळं करून उभी असलेली दिसत. कारच्या खिडकीवर टकटक केली जाई. पण बाकी काही घडलं नाही. खरं तर सरकार कुठलंही आणि कुठल्याही देशातलं असलं तरी ती उच्चवर्णीयांसाठी आणि धनिकांसाठी काम करणारंच असतं सहसा. नेटीवांच्या वस्त्यांमध्ये सोयीसुविधांचा अभाव तर जाणवलाच. पण हेही जाणवलं की काही सुशिक्षितांचा अपवाद वगळता नेटीवांसाठी नोकऱ्या या मॉलमध्ये विक्रेता, सफाई कामगार, उपाहारगृहातील कर्मचारी अशा स्वरूपाच्याच आहेत. शिक्षण फार महाग असल्याने (महाविद्यालयीन शिक्षणासाठी म्हणे एका सत्राला पस्तीस ते पन्नास हजार) ते गरीब नेटीवांच्या आटोक्यातही नाही. त्यामुळे शिक्षणाच्या अभावी नोकऱ्याही अशाच प्रकारच्या मिळतात. अजूनही घर घेतांना वर्णद्वेषाचा अनुभव अगदी थेट येत नसला तरी आडवळणाने येतो. “खायला पैसे नाहीत. वय सत्तरीच्या वर असलं तरी कुठलंही काम करायची तयारी आहे.” अशी पाटी घेऊन फिरणारे एक गृहस्थ दिसताच माईक म्हणाला, “निदान याला काम तरी करायचंय.” असा छुपा रोष मधूनच व्यक्त होत असतो. (माईकच्या न्याहारी आणि निवासमध्ये सगळ्या वर्णाचे लोक उतरतात आणि त्यांना तो सारख्याच प्रकारे मदत करतांना दिसतो, हे खरं असलं तरी)

पण असं असलं तरी ते अत्यंत आनंदाने जगायचा प्रयत्न करतात. अगदी सफाई कर्मचारीही व्यवस्थित मेकप केलेल्या, नेटका पोशाख केलेल्या, हसतमुख आणि आपलं काम अत्यंत चोख करणाऱ्या आढळल्या. मुळात इथला माणूस आनंदी वृत्तीचा आहे. गाणं नाचणं तर अगदी रक्तातच आहे. पहिल्या दिवशी आम्ही एका इथिओपियन रेस्तराँत गेलो होतो तिथला वाढपी स्वयंपाकघरात कुठलं तरी गाणं गुणगुणत नाचत होता. आम्ही जॅझ संगीत ऐकायला गेलो तिथली घरमालकीण असो, श्रोत्यांमधली छोटी मुलगी असो संगीत कानावर पडलं की त्यांचे पाय थिरकायला लागतात. आपल्याकडल्या गेट वे सारख्या वॉटरफ्रंट भागात गेलो होतो तेव्हा तिथल्या शाळकरी मुलांनी केलेला नाच तर फारच सुंदर होता.

इथला माणूसही तसा प्रेमळ. विमानतळावर माझी व्हीलचेयर सांभाळणारी मुलगी माझ्या चेहऱ्यावर जरासा जरी ताण दिसला तरी “मम्मा आर यू ओके मम्मा?” असं माझ्या गालांवर थोपटत विचारत होती. आम्ही सर्वत्र उबरने फिरलो. मला वाटलं चालक इथलेच दिसतात. पण क्षितिजने माहिती पुरवली की यातले ऐशी टक्के झिम्बाब्वेमधून नोकरीच्या शोधात आलेले आहेत, बाकीचे स्थानिक, आशियाई, नेटीव आहेत. स्थानिक लोक या बाहेरच्या लोकांवर खार खाऊन असतात. (एकूण कुठेही भायले भुतूरले चालूच असतं म्हणायचं). पण यातले बरेचजण आम्ही टॅक्सीतून उतरतांना प्रेमाने , “बाय ममा, बाय पपा, गुड इव्हिनिंग.” असं म्हणत. क्षितिज नेहमी ज्या उपाहारगृहांमध्ये जातो तिथले कर्मचारी त्याला ओळखत. तेही फार प्रेमाने आमचं स्वागत करीत. एके ठिकाणच्या दरवानाने आम्हाला भारतीय पद्धतीने वाकून नमस्कार केल्यावर आम्ही संकोचलो, तेव्हा त्याने क्षितिजला विचारलं, “धिस इज हाऊ यू ग्रीट यूवर एल्डर्स, इझण्ट इट?” कदाचित आमच्या रंगामुळे आम्ही त्यांना जवळचे वाटत असू. अर्थात भारतीय लोक हे श्रीमंत, बेपारी असा तिथल्या लोकांचा समज असलेला दिसला.

जॅझ संगीत हा गोऱ्या राजवटीच्या काळ्या दिवसांत लोकांना एकत्र आणणारा एक धागा होता. आता ‘जॅझ इन द नेटीव यार्ड’ या चळवळीच्या निमित्ताने पुन्हा हा धागा जोडला जातोय. गुगुलेथू, लांगा अशा नेटीव वस्त्यांमधल्या घरांच्या अंगणातल्या छोट्या जागेत सर्व वर्णाचे लोक एकत्र येताहेत, संगीताचा आस्वाद घेता घेता एकमेकांच्या जवळ येताहेत. क्षितिजने आम्हाला खास अशा एका मैफिलीत नेलं. सगळेजण खात पित, नाचत गात संगीताचा आस्वाद घेत होते. फरक इतकाच की पावसामुळे कार्यक्रम अंगणात न होता, घराच्या छोटेखानी बैठकीच्या खोलीत झाला. तिथल्या अंगणात एका स्थानिक कलाकाराच्या चित्रांचं प्रदर्शनही होतं. कार्यक्रम संपल्यावर अनेक लोक आम्हाला येऊन भेटले. आयोजकांनी आमचे पुन्हा पुन्हा आभार मानले. (पण एक गंमत झाली, घरमालकीणीचा कुणीतरी समज करून दिला की चंदर भारतीय राजदूत आहे).

तर अशा प्रकारे आमची एकूणच खात्री पटली की आपला मुलगा चांगल्या ठिकाणी गेलाय.

शिक्षणाची परीक्षा

अलीकडेच प्रथम या स्वयंसेवी संघटनेतर्फे एक अहवाल प्रसिद्ध झाला. तो वाचल्यावर शिक्षणव्यवस्थेविषयी बऱ्याच शंका उपस्थित होतात. उदाहरणार्थ त्यांनी केलेल्या सर्वेक्षणानुसार उत्तर प्रदेशातील तिसऱ्या इयत्तेतील ६०% मुलं अक्षरं ओळखू शकत नाहीत. काही राज्यांमधील पाचव्या इयत्तेतील ५०% मुलं दुसरीचं पाठ्यपुस्तक वाचू शकता नाहीत. आठवीतल्या मुलांना साधी साधी बेरीज वजाबाकीची गणितं सोडवता येत नाहीत. हे सगळं फार धक्कादायक आहे. आमच्या लहानपणी तर स्वराज्याला जेमतेम एक तप झालेलं असूनही परिस्थिती फार चांगली होती. सरकारी शाळामध्ये , नगरपालिकेच्या शाळांमध्ये चांगले, उत्साही शिक्षक होते. ते मुलांना प्रेमाने शिकवत. माझा नवरा जिथे आजही एस्.टी. जात नाही अशा खेड्यात वाढला. पण तिथेही त्याला चांगले शिक्षक मिळाले. त्यांनी त्याला शिक्षणाची, वाचनाची गोडी लावली. आमच्या मुंबईतल्या नगरपालिकेच्या शाळेत तर चक्क एका लाकडी पेटाऱ्यात पुस्तकं ठेवलेली असत आणि आम्ही हवं ते पुस्तक घेऊन वाचत असू. विद्यार्थीच नव्हे तर आमच्या कामगार भागातल्या गिरणी कामगारांनाही शिकायची सोय होती. नोकरी करून शिकणाऱ्यांसाठी रात्रशाळा होत्या. महाविद्यालयांची सकाळची आणि संध्याकाळची सत्रं असत जिथे नोकरी करणारे विद्यार्थी शिकत. पण तेव्हा शिक्षणासाठी अनुकूल वातावरण होतं, जे आता नाहीय. आताचे राजकारणी शिक्षणसम्राट आहेत. त्यांच्या उच्चभ्रू संस्थांमुळे शिक्षणव्यवस्थेवर परिणाम होऊ लागलाय. दुसरीकडे एकेकाळी मातृभाषेतून शिक्षण देण्याचा आग्रह धरणाऱ्या पालकांची मानसिकता बदलली आहे आणि इंग्रजी माध्यमातून दिलं जाणारं शिक्षण म्हणजेच चांगलं शिक्षण अशी जी धारणा होत चालली आहे त्याला कनिष्ठ आर्थिक वर्गातले पालकही बळी पडायला लागलेत आणि झेपत नसतांनाही मुलांना इंग्रजी माध्यमांच्या महागड्या शाळांमध्ये मुलांना शिकवताहेत. हे आईबाप स्वतः इंग्रजी माध्यमात न शिकलेले किंवा अजिबात न शिकलेले असल्याने मुलांना शिकतांना पालकांची मदत होत नाही आणि शिक्षकांना शिकवण्याव्यतिरिक्त इतर कामं वाढल्याने शिकवायला वेळ नाही. या सगळ्याचा परिणाम मात्र बिचाऱ्या मुलांवर होतोय. त्यांच्या शिक्षणाचा दर्जा वाढवायला फक्त माध्यान्ह भोजन, दप्तरं, टॅब हे सगळे देऊन उपयोग नाही तर या समस्येच्या मूळाशी जाण्याची गरज आहे.