रस्ता

घरासमोर फार मोठ्ठं खारफुटीच्या जंगलाचं, उत्तनच्या डोंगरांचं दृश्य दिसतं. त्यामुळे दिवसभरात अधूनमधून आणि संध्याकाळी बाहेरच्या जगाशी आता असलेला हा एकमेव संपर्क बंद व्हायच्या आधी सूर्यास्तापर्यंत खिडकीत रेंगाळायचा मोह आवरता येत नाही.

आज मात्र नेहमीच्या वेळेच्या बऱ्याच आधी कुत्र्यांच्या केकाटण्याने खिडकीने जवळ यायला भाग पाडलं. आमच्या या छोट्याशा रस्त्यावर पाच सहा कुत्री आहेत. ल़ॉकडाऊनच्या आधी एक जोडपं गाडीतून येऊन त्यांना खायला घालीत असे. कुत्र्यांना, पक्ष्यांना पाणी पिण्यासाठी रस्त्याच्या दोन्ही बाजूंना वापरात नसलेल्या दगडी रगड्यांची पाळी लोक टाकून देण्याऐवजी आणून ठेवतात. अलीकडेच कारवारातल्या गावी कायमचं रहायला गेलेल्या मैत्रिणीनेही असंच केलं होतं. त्यात कुणीतरी (बहुधा त्या त्या इमारतींचे रखवालदार) पाणी भरुन ठेवतं. सध्या त्या कुत्र्यांना खायला मिळत नसल्याने ते असेच एका पक्ष्याच्या पिल्लाच्या मागे लागले. ते पिल्लू घाबरून समोरच पार्क केलेल्या एका गाडीखाली घुसलं. तिथे ते कुत्रेही पंजा घालायला लागल्यावर बहुधा तीन तरुणी तिथे आल्या आणि त्यांनी कुत्र्यांना हुसकावून लावलं. पण ते पिल्लू काही त्यांना काढता येईना. जवळून जाणाऱ्या एका पोरसवदा मुलाला सांगून पाहिलं. त्यालाही जमेना. मग त्यांनी फोनवरुन कुणाला तरी बोलावलं. मधल्या काळात कुत्र्यांसाठी पाव पैदा केला. तर तिकडे तेवढ्यात आपल्याला कुत्र्यांपासून वाचवणारं कुणीतरी आलंय म्हणून कावळे फारच आत्मविश्वासाने कुत्र्यांभोवती कडं करायला सुरुवात केली. इतकंच नाही तर नुकत्याच बाळंत झालेल्या कुत्रीच्या पिल्लाला टोचे मारायला लागले. मग पुन्हा मुलींची तारांबळ उडाली. त्यांनी कावळ्यांपासून वाचायला गटाराच्या कडेला लपलेल्या पिल्लाला हळूहळू विश्वास देत ताब्यात घेतलं. कावळ्यांनाही खायला काहीतरी दिलं.

हे सगळं चालू असतांनाच. समोरच्या इमारतीचा पहारेकरी कुठेतरी गेलाय याची खात्री करुन घेऊन एक मुलगा फाटकाबाहेरच्या गुलमोहरावरुन आतल्या आंब्याच्या झाडावर चढला ( सुरुवातीलाच रो ङाऊस आहे तेही आत त्यामुळे कुणी पाहिलं नसावं).  त्याचा साथीदार फाटकाबाहेर पिशवी हातात घेऊन तयारीत राहिला. झाडावरच्या मुलाने पाचदहा मिनिटात पिशवीभर कैऱ्या काढून बाहेर उभ्या असलेल्या मुलाकडे फेकल्या. त्यांच्यातला समन्वय इतका चांगला होता की मला क्रिकेटच्या सामन्याची आठवण आली. दोनतीन कैऱ्याच खाली पडल्या असतील. बाकीच्या सगळ्या पिशवीत जमा झाल्या. पिशवी भरल्यावर फार अधाशीपणा बरा नाही असा वयाला न शोभणारा पोक्त विचार करून मुलं पळाली. ती गेल्यावर साधारण तीन चार मिनिटांत त्या इमारतीतले एक गृहस्थ आले. त्यांना दोन कैऱ्या पडलेल्या दिसल्या त्या उचलून खिशात घालीत ते चालू पडले. मग पहारेकरी पोचला. त्याच्याही नशीबात एक कैरी होती. ती उचलून त्याने आपल्या केबिनमध्ये ठेवली.

मधल्या काळात मुलीही पिल्लाला घेऊन गेल्या.

रस्ता पुन्हा सामसूम झाला.