रस्ता -६

घराखालून जाणाऱ्या रस्त्यावर समोरच्या पदपथावर अदानींचं काम कंत्राटावर करणाऱ्या कामगारांचा एक जत्था राहत होता. सकाळ संध्याकाळ त्यांच्यामुळे रस्ता जागा असे. रात्री उशिरापर्यंत ते गप्पा हाणत, ट्रान्झिस्टरवर गाणी ऐकत बसत. पहाटे साडेचारलाच त्यांचा दिवस सुरु होई. सकाळी सूर्योदयासोबतच कामाला सुरुवात होई त्यांची. मग नऊच्या सुमारास ब्रंच म्हणजे सांबारभात, क्वचित उपमा. संध्याकाळी काम संपल्यावर पुन्हा जमल्यास आंघोळ किंवा जमेल तितकी स्वच्छता उरकून जेवून घेतलं की त्यांच्या गप्पाटप्पा, मस्ती चालू होई. एक जोडपं सतत भांडत असे. एकदा त्यातल्या नवऱ्याने बायकोला जरा जोरात झापल्यावर इतर बायका खोट्या रागाने त्याला काठीने मारु का मारु का विचारत होत्या.  त्यांच्यातला एक तरुण मुलगा कायम मोठ्याने गाणी लावून ऐकत बसे म्हणून मला जरा राग येई. पण एकदा पाहिलं तर त्याची आई चहा करीत असतांना त्याने साखर पळवून खाल्ली. जरा निरखून पाहिलं तर ध्यानात आलं की तसा लहान मुलगाचं होता तो पौंगडावस्थेतला. इतर पुरुषांबरोबर कष्टाची कामं करुन थोराड दिसायला लागला होता इतकंच. त्या सगळ्यांसोबत जगण्याची इतकी सवय झाली त्या दिवसात की एक दिवस एकाएकी पदपथावरून सामानासह ते नाहीसे झाल्यावर वाईट वाटलं. ते फक्त आपलं काम करीत असंच नाही. समोरच्या घरामागे माड आहे. त्याच्या झावळ्या खाली पडलेल्या असत. त्यांच्यातली स्वैंपाक करणारी बाई फावल्या वेळात त्या  सुकलेल्या झावळ्यांपासून झाडू तयार करी. ते पाहिल्यावर समोरच्या घरातले लोक लगेच म्हणायला लागले त्या आमच्या माडाच्या झावळ्या आहेत. मग त्यांनाही तिने त्यातल्या दोनतीन झाडू दिल्या त्या बदल्यात. आता ते मुख्य रस्त्यावर काम करायला गेले तरी त्यांच्यातला एकजण येऊन ते झाडू करायचं  काम करीत बसतो वेळ मिळाला की. आजही तो बसला होता दुपार सरेपावेतो.

समोरच्या खाजणाकडे जाणाऱ्या रस्त्याच्या तोंडाशी खाजणात राहणारा एक मुलगा नेहमीसारखा ड्रम सायकलच्या हँडलला टांगून पाणी भरायला निघाला होता. त्याच्या ओळखीच्या कुटुंबातली एक अडीच-तीन वर्षांची मुलगी तिथेच आईची वाट पाहत खेळत होती. तो मुलगा तिथेच थांबून सायकलने त्या मुलीला टेकलत आत ढकलत राहिला. मी सध्या बोलूही शकत नाही, ओरडणं तर दूरच. काय करावं असा विचार करीत राहिले. एकदा मनात आलं की कदाचित त्या मुलीच्या आईने तिच्यावर लक्ष ठेवायला सांगितलं असेल, ती रस्त्यावर जाऊ नये म्हणून हा असं करीत असेल. पण तसं नव्हतं. खाजणातून त्याच्या ओळखीचे लोक येतांना दिसले की तो ते थांबवी, त्यांची पाठ फिरली की पुन्हा त्याचा हा उद्योग सुरु होई. शेवटी तो तिला तिथे सोडून गेला. मुलगी मग गोल गोल फिरत नाचायला लागली, उड्या मारायला लागली. तिची मावशी किंवा कुणी तरी आणखी तीन लहान्या मुलींसोबत तिथे आली. समोरच्या घरातल्या बाईने त्या सर्वांना खाऊ दिला. मग मुली खेळत राहिल्या.

समोर खाजणातच राहणारं एक जोडपं अगदी सूर्य मावळायच्या पाच मिनिटं आधी येतात. दोघंही कुठेतरी नोकरी करीत असावीत पण वेगवेगळ्या ठिकाणी.  कधी पाठीला पाठपिशवी लावलेला नवरा आधी येई तर कधी खांद्यावर पर्स घेतलेली बायको आधी येई. मला नेहमी कुतूहल वाटे की अशी कुठली नोकरी करीत असतील ही दोघं की सूर्यास्ताच्या वेळा बदलल्या तरी बरोब्बर सूर्य मावळायच्या आत पोचतात.  आज बायको आधी आली. आज ती रिक्षाने आली. कारण तिच्याकडे खरेदीच्या दोनतीन जड पिशव्या होत्या. नवरा आला नाही हे बघितल्यावर तिथेच समोरच्या घराशेजारी बसली. तिच्या ओळखीचे एक गृहस्थ तिथे आले. त्यांना तिने विचारलं, “काय खाल्लंत मग?” कधीही लोक संभाषण जेवलात का, काय खाल्लंत यापासून का सुरु करतात काय जाणे, मग ते सामाजिक माध्यमावर का असेना. त्या गृहस्थांनी विचारलं, “रघू नाही आला का अजून?” त्यांचं सगळं संभाषण ऐकू येत नव्हतं रहदारीमुळे. पण अशा नोकरीपेक्षा मंत्रालयात नोकरी करावी असं ते गृहस्थ म्हणत होते, जसं काही ती नोकरी अगदी सहजच मिळते. सध्या नोकऱ्या गेल्यामुळे चांगले शिकलेले लोक भाजी विकताहेत अन् मंत्रालयातली नोकरी कुठून मिळायला. पण त्यांच्या सांगण्यावरून तिने नवऱ्याला फोन लावला. तो लवकर येऊ शकणार नाही हे कळल्यावर ती सामान उचलून चालू लागली. मघाचा मुलगा पाण्याचे ड्रम घेऊन तितक्यातच पोचला. त्याने आपणहून त्या बाईला विचारलं तुमचं काही सामान घेऊ का सायकलवर म्हणून.  तिने एक पिशवी दिली. पण दुसरंही ओझं जड दिसत होतं. म्हणून त्याने तेही घेतलं. आणि तो सायकल हळू चालवत तिच्यासोबत निघाला.

ते का निघून जातात?

आठवडाभरापूर्वी आमच्या शेजारच्या इमारतीतले एक गृहस्थ सकाळी सात वाजता किराणा खरेदीसाठी घरापासून मोजून चार मिनिटांवर असलेल्या डी मार्टला जायला बाहेर पडले, त्यानंतर ते घरीच परतले नाहीत. खूप शोधाशोध झाली, पोलीसांकडे तक्रार करुन झाली, सामाजिक माध्यमांवरुन निरोप धाडले गेले. काहीच झालं नाही. पण आज चक्क ते घरापासून पायी वीस मिनिटांवर असलेल्या चर्चच्या परिसरात सापडले. सगळ्यांना एकच उत्सुकता – ते का निघून गेले?

आजवर नात्यागोत्यात, ओळखीपाळखीत अशी बरीच माणसं घराबाहेर गेल्यावर नाहीशी झाली, त्यातली काही एकदोन दिवसात सापडली, काही महिन्यांनी सापडली, तर काही सापडलीच नाहीत. मनोरुग्ण असलेल्या माणसांची गोष्ट वेगळी. ती आपल्या मर्जीने जात नाहीत. पण चांगल्या खात्यापित्या घरात, प्रेमाची, काळजी घेणारी माणसं आजूबाजूला असतांना माणसं घर सोडून का जातात?

घरातल्यांवर रुसून जाणाऱ्यात पौगंडावस्थेतली मुलं बरीच असतात. आमच्या नात्यातला असाच एक मुलगा घरात सगळे कामं सांगतात म्हणून रुसून गेला. रोज कुणी तरी घरच्यांना सांगे त्याला कुर्ल्याला पाहिलं, त्याला कल्याणमध्ये पाहिलं. नंतर बाहेर राहून त्याला शेवटी आपला निभाव लागणार नाही असं वाटलं की काय कुणास ठाऊक, काही महिन्यांनी तो स्वतःच घरी परतला. पण सगळीच मुलं अशी सुदैवी नसतात. काही पाकिटमारी करणाऱ्या टोळ्यांच्या हाती, गुंडांच्या हाती सापडतात आणि परतीची वाट सापडत नाही.

पण चांगले संसार मांडून बसलेले लोकही असे रुसून जातात. गंमत म्हणजे त्यांनी आधी तशी धमकी दिलेली असते पण घरातले लोक ते फारसं मनावर घेत नाहीत. जाऊन जाऊन जाणार कुठे, कोण याला घेणार अशी थट्टा करतात. जेव्हा हे खरोखर घडतं तेव्हा मात्र ते हादरतात, पश्चात्तापाच्या आगीत होरपळतात.

आमचा एक मित्र एकदा असाच निघून गेला. सगळ्या मित्रांनी शक्य होती ती सर्व ठिकाणं पालथी घातली. बायकोने तर रात्रीबेरात्री रेल्वे स्थानकावर झोपलेल्यांची पांघरुणं काढून त्यांचे चेहरे पाहून खात्री करुन घेतली. शेवटी त्याने खात्यातून पैसे काढून घेतल्यावर तो सुरक्षित असावा असं वाटलं. काही दिवसांनी तो एका मित्राला भेटला आणि शेवटी घरी परतला. पण तोवर सर्वांचा जीव टांगणीला लागलेला.

म्हातारी माणसं जेव्हा विस्मरणाचे आजार होऊन नाहीशी होतात तेव्हा तर काळजाचा ठोका चुकतो. एका मैत्रिणीचे वडील असेच. खाली गेटपर्यंत जातो म्हणून गेले आणि चुकून बाहेर पडले, मग त्यांना घर सापडेना. सुदैवाने दोन दिवसांनी ते सापडले. पण बरेचदा पुरुषांच्या बाबतीत असं घडतं की निवृत्त झाल्यावर त्यांना घरच्यांशी जुळवून घेता येत नाही. पूर्वी जो मान मिळायचा तो आता मिळत नाही म्हणून त्यांचं मन उडून जातं आणि ते घर सोडून जातात. बरं म्हातारपणात मन इतकं मानी होतं कुटुंबियांच्या बाबतीत की काहीजण अशा टोकाच्या विचारांपर्यंत पोहोचतात की त्यांना घरच्यांकडून काही घेणं म्हणजे भीक मागण्यासारखं वाटू लागतं.

सहसा बायका घरातल्यांशी जुळवून घेतात. तसंही बाहेर पडण्यातले धोके त्यांना अधिक घाबरवतात. पण तरुण मुलींना मात्र त्याचा अनुभव नसतो, तरुणपणातला एक आत्मविश्वास असतो. अशा बाहेर पडलेल्या मुलींना फार वाईट अनुभव येतात बरेचदा. त्यावर लिहायला खूप आहे, पण प्रौढ बायका घर सोडून गेल्याच्या घटना मात्र फार कमी आढळतात.

बरेचदा अशा लोकांच्या बाबतीत दुर्घटना घडतात, पोलीसांना तपशील न सापडल्याने त्यांचे मृतदेह कुठल्यातरी अनोळखी ठिकाणी चिरविश्रांती घेतात. कधी घरच्यांना कळतं कधी कळत नाही, ते वाट पहात रहातात वर्षानुवर्ष. आपलं नक्की काय चुकलं याचा विचार करीत अपराधगंड बाळगत जगतात काही वर्षं. मग आपलं माणूस नसण्याची त्यांना सवय होऊन जाते कधीतरी, फक्त आठवण उरते.

अशा घटना बाजूला ठेवल्या तर इतर लोकांचं काय? ते खरंच का निघून जातात?

मला असं वाटतं की काही लोकांना या पळून जाण्याचं एक रोमँटिक आकर्षण असतं. रोजच्या जगण्यातला कंटाळवाणा दिनक्रम सोडून काहीतरी रोमहर्षक जगावंसं वाटतं. जिथे पुढच्या क्षणी काय घडेल काय करावं लागेल याचे ठोकताळे बांधता येत नाहीत. त्या माणसांच्या लेखी ते एका वेगळ्याच जगात जाऊ पहात असतात. पण बाहेर पडल्यावर त्यांना ते त्यांच्या मनातलं जग सापडतं का? नाही सापडलं म्हणून ते असेल त्याच्याशी तडजोड करत त्याच जगात रहातात की तडजोड करता येत नाही म्हणून परत येतात? काय असतं त्यांच्या मनात? ते का निघून जातात? ते का परतून येतात किंवा त्याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे ते का परतून येत नाहीत?