बनवाटाकामारा

आज सकाळी ओवीबरोबर चंदरचा वॉट्स अॅप संवाद चालू होता. ती म्हणाली, “बाबा मी चहा बनवतेय” चंदर तिला म्हणाला, “तू असं म्हटलंस तर माधुरी पुरंदरे रागावतील. त्या बनविणे या क्रियापदाच्या विरोधात आहेत. अलीकडे लोक कशासाठीही बनविण्याचा उपयोग करतात असं त्या म्हणतात. मराठीत म्हणे चहा ठेवतात किंवा करतात. तर तू चहा ठेव किंवा कर.” यावर तिचं म्हणणं असं की सगळेच सगळ्यांना बनवतात बाबा आजकाल. तर मी तिला म्हटलं, “काही लोक चहा घाल म्हणतात, विदर्भात चहा मांडतात तर कोकणात चहा टाकतात. कोकणातली क्रियापदं तर फारच वेगळी. तिकडे चहा खातातही, पंखा किंवा दिवा लावतात, काढतात, कुणीतरी यायला होतो ( चंदर यायची वेळ झाली असं माझ्या सासूबाईम्हणतांना चंदर यायला झाला असं म्हटलं की माझ्या सासूबाई खिक्कन हसायला लागायच्या. त्या म्हणत आपल्याकडं म्हैस यायला होते म्हणजे म्हैस व्यायची वेळ जवळ येते.) प्रसिद्ध लेखक विलास सारंग यांनीही यावर काहीतरी लिहिलंय असं आठवतं. काही हिंसक लोक तर काहीही मारतात. ते चहा मारतात, कुणाला तरी मोबाईल मारतात, कशावर तरी सही मारतात. याशिवाय ते कुणाला फेकून मारणं, उचलून मारणं, बाण मारणं वगैरेही करीत असावेत असा दाट संशय आहे. तुम्ही काय काय मारता ते सांगा बरं का!

गोष्ट तिसरी

गोष्ट तिसरी

ही गोष्टही वरच्या गोष्टीतल्या पेक्षाही खुळचट असलेल्या बाईची आहे. पुन्हा एक बाई होती, तिला नवरा होता. (आता हे तुमच्या सवयीचं आणि ओळखीचं झालं असेल). त्या बाईचं नाव ठेवू शांता. (कारण ही गोष्ट सांगणाऱ्या माझ्या आजीचं नावही तेच होतं, शांताबाई कदम) तर या शांताबाईला एक सासूही होती. त्या सासूवर तिचं फार म्हणजे फार म्हणजे फारच प्रेम होते. लग्न झालं तेव्हा तिला काहीच काम करता येत नव्हतं. सगळं सासूनेच शिकवलं होतं. त्यामुळे तिला सगळं सासूला विचारून करायची सवय होती. अगदी साध्या साध्या रोजच्या छोट्या छोट्या गोष्टीही ती सासूला विचारून करीत असे. पण सासू काही तिच्या जन्माला पुरणार नव्हती. ती एक दिवस म्हातारपणामुळे मेली. शांताने रडून रडून गोंधळ घातला. ती सासूला नेऊच देईना. आता काय करायचं? शेवटी तिच्या नवऱ्याने थेट आपल्या आईसारखी एक बाहुली तिला दिली आणि म्हटलं, “ही घे तुझी सासू.” हे ऐकून शांता शांत झाली. ती बाहुली छातीशी कवटाळून ती घरात गेली. मग दुसऱ्या दिवसापासून एक नवा प्रकार सुरू झाला. त्या बाहुलीला तिने आपली सासू बसत असे तिथे बसवलं. मग ती सासूला जे विचारीत असे ते ते बाहुलीला विचारू लागली. “सासूबाई, सासूबाई न्याहारीला काय करू? थालीपीठ करू का?” “सासूबाई, सासूबाई मीठ कीती घालू? इतकं पुरे का?” आता बाहुली कशी बोलणार. पण शांता स्वतःच म्हणे, “थालीपीठ नको बरं. पानगी कर.” “हं. इतकं पुरे.”  सकाळपासून रात्रीपर्यंत अस्सं चालत असे. नवऱ्याने हे बघितलं बघितलं नि एक दिवस या खुळचट बायकोबरोबर संसार कसा करायचा म्हणून तिला घराबाहेर काढलं. (सगळे नवरे असे बायकांना घराबाहेर काढीत की काय!). शांताने नवऱ्याने आतून बंद केलेल्या दारावर थपडा मारल्या, विनंत्या केल्या पण काही उपयोग झाला नाही. तेव्हा आपल्या माहेरी जायला ती निघाली. रात्र पडत आली होती. चोहीकडे अंधार दाटून आला होता. शांता वाट चुकली. चुकून जंगलात शिरली. तिला काही कळेना. जंगली जनावरांचे आवाज ऐकून ती घाबरली आणि ‘सासूबाई’ला काखोटीला मारून झाडावर चढली. रात्र झाली. योगायोगाने ती ज्या झाडावर बसली होती. त्या झाडाखाली काही चोर चोरलेला माल वाटून घ्यायला बसले होते. त्यांची वाटणी चालली होती, तितक्यात शांताबाईला झोप लागल्याने तिच्या हातून ‘सासूबाई’ निसटून खाली पडली. मग काय! ती दचकून जागी झाली, सासूबाई हातात नाही म्हटल्यावर घाबरून मोठमोठ्याने रडायला लागली. सासूबाई, सासूबाई म्हणून ओरडू लागली. एवढ्या घनदाट जंगलात कुठून बाईचा आवाज येणार. तेव्हा हे नक्कीच भूत आहे असं वाटून ते आपला माल तिथेच टाकून पळत सुटले. सकाळी शांताबाई झाडावरून खाली उतरली. तिची ‘सासूबाई’ तर सापडलीच पण बरेचसे दागदागिने, पैसाअडका सापडला. तशी खुळचट असली तरी तिला या गोष्टींचं महत्त्व माहीत होतं. ते सगळं तिने एका गाठोड्यात गोळा करून सासूसोबत ते गाठोडंही काखोटीला मारलं आणि सासरचं घर गाठलं. पण नवरा काही घरात घेईना. मग तिने सांगितलं, “अहो, पहा तरी मी केवढं धन आणलंय ते!” ते ऐकताच नवऱ्याने दार उघडलं आणि तिला घरात घेतलं. ती सुखाने नांदू लागली. पण गोष्ट एवढ्यावर संपली का? तर नाही. शांताबाईच्या नवऱ्याला हाव सुटली. त्याने आणखी आठपंधरा दिवसांनी पुन्हा शांताबाईला त्या जंगलात सासूबाईला घेऊन पुन्हा पाठवलं आणि त्या झाडावर बसवलं. रात्र झाली. पुन्हा पेंग आल्यावर सासूबाई खाली पडली. दचकून जागी होऊन शांताबाई किंचाळली. पण या वेळी पौर्णिमा होती. चोरांनी ठरवलं की तसा काळोख नाही, पहाटेपर्यंत थांबून पाहू काय होतं ते. शांताबाई खाली उतरली. आधी सासूबाईला घेतलं कडेवर, मग चोरांनी मुद्दाम तिथे सोडून दिलेलं धन गोळा करून ती जाऊ लागल्यावर चोरांनी तिला पकडलं. तिचं नाक कान कापून सोडून दिलं. आता नाककान कापलेल्या विद्रूप आणि पैसेही न आणू शकणाऱ्या बायकोशी कसा संसार करायचा म्हणून नवऱ्याने काही तिला घरात घेतलं नाही. तिचं पुढे काय झालं ते आजी कधी सांगत नसे. ती स्वतः विधवा आणि एक मुलगी पदरात असल्याने सासरच्यांचा आधार गमावलेली बाई. तिला अशा बायकांचं पुढे काय होतं ते ठाऊक असल्याने तिने कधीच सांगितलं नसावं. किंवा कदाचित तिच्या लेखीही ही एक मूर्ख बाई असल्याने नसेल सांगितलं. पण ही गोष्ट ऐकून लहानपणीही मला कधी मजा वाटली नाही. तेव्हाही मला वाटे की हिचं किंवा सखूबाईचं काय झालं असेल पुढे.