औंधचं कलासंग्रहालय

सांगली जिल्ह्यातल्या तडसर या उदय रोटेंच्या गावी दोन दिवस रहातांना आजूबाजूची बघण्याजोगी ठिकाणं पहायला डॉ. कैलास जोशींच्या गाडीने निघालो. गाडीचे मालकचालक, स्वतः उदय, डॉ. गजानन अपिने, चंदर आणि मी. इतक्या थोर समीक्षकांमध्ये माझ्यासारखी एकटी अज्ञ कवी सापडल्यावर काय होईल याची कल्पना केलेली बरी. गहन, गंभीर चर्चा चालत असतांना मी फक्त श्रवणभक्ती करत होते. अर्थात सगळीच चर्चा काही गंभीर नव्हती. बरेच किस्सेही सांगितले जात होते. उदयने गंमतीने आमच्या गावाला ‘सकाळी तडसर आणि दुपारनंतर येडसर’ असं म्हटलं जातं असं सांगितलं. मला वाटलं की हे पिण्याबिण्याशी संबंधित असेल. पण अगदीच तसं नव्हतं. वैराच्या, सूडाच्या भावनेने केल्या जाणाऱ्या हत्यांचा संदर्भ होता. खरं तर आमचे साताऱ्यातले सर्व प्रेमळ मित्र आणि उदयच्या गांवचे आतिथ्यशील लोक पहाता ते खरं वाटेना. पण सुप्रसिद्ध बापू वाटेगावकर याच पट्टयातले. त्यांची मुलाखत मी पाहिली आहे. अन्यायाविरोधात का होईना त्यांच्याकडून खून झाले त्यामुळे थोडंफार तथ्य या संदर्भात आजघडीला असण्याची शक्यता नाकारता येत नाही. असो, तर सर्वात प्रथम आम्ही मोहरा वळवला तो औंध संस्थानाच्या दिशेने. यमाई मंदिर पाहून मग कलासंग्रहालय पहायला निघालो.

औंधचे संस्थानिक भवानराव उर्फ बाळासाहेब पंतप्रतिनिधी यांच्याविषयीचे संदर्भ माडगूळकरबंधूंच्या लिखाणात बरेच आढळतात. राजाचं व्यायामाचं वेड, कलासक्ती, जनसामान्यात मिसळून जाणं इत्यादी. तर याच बाळासाहेबांनी बांधलेलं हे कला संग्रहालय. याचा आराखडाही त्यांनीच तयार केला आहे. आतली रचना साधी पण व्यवस्थित उजेड यावा आणि एका दालनातून दुसऱ्या दालनात जात जात सर्व संग्रहालय पाहून बाहेर पडता यावं अशा प्रकारची आहे. बाहेर मोठं आवार, त्यात लावलेली देशी झाडं, ठिकठिकाणी बसायला बाकं, बाग, मुख्य म्हणजे चांगलं स्वच्छतागृह आहे. फक्त ज्यात लोकांना घरून आणलेलं अन्न खाण्यासाठी व्यवस्था असलेला एक भाग असेल आणि खाद्यपदार्थ विकतही मिळतील अशा एका उपाहारगृहाची सोय असायला हवी होती. कारण संग्रहालय पहायला अख्खा दिवसही अपुरा पडतो आणि बाहेर बागेत बसून लोक घरून आणलेले पदार्थ खातांना दिसत होते. त्यामुळे कचराही होतो.

संग्रहालयाच्या प्रवेशद्वाराजवळ बाळासाहेबांचं कट्याळकरांनी काढलेलं मोठं तैलचित्र आहे. आत वेगवेगळ्या दालनात भारतीय आणि पाश्चात्य चित्रकारांनी काढलेली मूळ चित्रं आणि काहींच्या प्रतिकृती, शिल्पं, प्रसिद्ध शिल्पांच्या स्थानीय कलाकारांकडून करून घेतलेल्या प्रतिकृती आहेत. एक दालन वेगवेगळ्या शस्त्रास्त्रांचं आहे. एका दालनात राणीने – भवानरावांच्या तिसऱ्या पत्नी माईसाहेब यांनी भरतकामाने केलेली चित्रं आहेत. त्यात भरतकामाने सूर्योदयाच्या वेळच्या प्रकाशाच्या छटा एका चित्रात फार छान आल्या आहेत. भवानरावांचे पुत्र अप्पासाहेब हे भारताचे राजदूत म्हणून काम करीत असतांना त्यांना भेट मिळालेल्या आणि त्यांनी संग्रह केलेल्या वस्तूंचे एक दालन आहे. त्यातल्या इतर वस्तू तर बघण्याजोग्या आहेतच पण कळसूत्री बाहुल्या नक्की पहाव्यात. आणखी एक आवर्जून पहावी अशी चीज म्हणजे तिबेटी पोथ्या. त्या पोथ्यांची अक्षरलेखनकला तर पहाण्याजोगी आहेच पण त्यांची रंगसंगतीही सुंदर आहे.  कोट्याळकरांनी शिवतांडवनृत्याच्या केलेल्या चित्रमालेचं एक दालन आहे. वेगवेगळ्या तत्कालीन कलाकारांनी केलेली आत्मचित्रं आणि इतर कलावंतांची रेखाटलेली व्यक्तीचित्रं आहेत. त्यातलं आबालाल रहिमानांचं व्यक्तीचित्रं ( आठवत नाही पण बहुधा बाबूराव पेंटरांनी काढलेलं असावं) वेगळं आहे. एम्.व्ही. धुरंधर, पंडित सातवळेकर, माधवराव सातवळेकर, बाबूराव पेंटर इत्यादींची चित्रं पहायला मिळतात. राजा रवी वर्मा यांची ‘सैरंध्री’, ‘दमयंती’ आणि ‘मल्याळी तरूणी’ ही मूळ चित्रं पहायला मिळतात. तसंच वेगवेगळ्या चित्रकारांनी रेखाटलेली सैरंध्रीही बघता येते.  मोगल, राजस्थानी, पहाडी, बंगाली, पंजाबी अशा वेगवेगळ्या शैलींतील अभिजात भारतीय लघुचित्रांचा मोठा संग्रह आहे. त्यात रागमालिका, अष्टनायिका आहेत, ज्या मुंबईतल्या वस्तूसंग्रहालयातही पहायला मिळतात. पण आम्ही सर्वात अधिक रेंगाळलो ते पहाडी शैलीतल्या (बहुधा)  मोलाराम या चित्रकाराच्या किरातार्जुन युद्धाच्या मालिकेची चित्रं पहाण्यात. मोलाराम हा अठराव्या शतकातला चित्रकार एक कवी, इतिहासज्ञ, तत्वज्ञ आणि राजनीतिज्ञही होता. तो मूळचा काश्मीरचा आणि तो मोगल शैलीत चित्रं काढीत असे. पण तो नंतर गढवाल राज्यात आला. त्याने गढवाल शैलीला एक नवे वळण दिलं असं म्हणतात. या चित्रमालिकेत जवळपास शंभरच्या आसपास चित्रं या एकाच विषयावर आहेत आणि ती घटनाक्रमानुसार लावलेली आहेत. त्यामुळे ती पहातांना चलच्चित्र पहात असल्याचा भास होतो. तप करणाऱ्या अर्जुनाच्या हळूहळू वाढत जाणाऱ्या दाढीमिशा, आजूबाजूच्या जंगलात लहानमोठे प्राणी वावरताहेत, मोठे प्राणी लहान प्राण्यांची शिकार करताहेत, तपोभंग करण्यासाठी आलेल्या सुंदर अप्सरांचे विभ्रम आणि या साऱ्याने विचलीत न होता चालू असलेली अर्जुनाची तपश्चर्या. हे सगळं दाखवतांना एकाच सपाट पृष्ठभागावर ही सगळी छोटी, छोटी कथनं चित्रकाराने दाखवली आहेत. युद्धाच्या वेळी हळूहळू पुढेमागे होणारे लढाईचे पवित्रे घेणारा वेगवेगळ्या मुद्रेतला अर्जुनही एकाच पृष्ठभागावर दिसतो. एव्हढ्याशा अवकाशात हे सगळं दाखवतांना जे सूक्ष्म रेखाटन केलेलं आहे ते अप्रतिम आहे. रंगांचा वापरही फार सुंदर आहे आणि ते सुंदर रंग अजूनही तितकेच ताजे वाटतात हे विशेष. त्या चित्रांमध्ये काहीतरी लिहिलेलंही होतं. पण वाचण्याइतका वेळ नव्हता. बहुधा त्या मोलारामच्या चित्रविषयासंबंधी कविता असाव्यात. या एकाच दालनात फार काळ रेंगाळल्याने जवळपास अर्धं संग्रहालय पहायचं राहून गेलं. बघू पुन्हा कधीतरी.