व्हिनिशियन ब्लाइंड्समधून समुद्र बघणारी मुलगी

खिडकीतून दूरवर कुठेतरी खाडीचं पाणी चमकत होतं. त्या पलीकडे दोन गावं होती जिथे समुद्रकिनारा होता. पण इथून फक्त खाडीच्या पाण्यावरच समाधान मानावं लागत होतं. तिला विलास सारंगांच्या कादंबरीचा नायक आठवला – समुद्राकाठचं शहर सोडतांना खाडीपासून लांबवर का होईना समुद्र असेल म्हणून खाडीदेशात नोकरी पत्करणारा.

लहानपणी डोक्यात खवडे झाले तेव्हा आईपप्पा शिवडीच्या समुद्रावर स्नानासाठी घेऊन गेले होते. तेव्हा तिने पहिल्यांदा समुद्र पाहिला. तिला नंतर आठवत राहिलं ते फक्त नाकातोंडात गेलेलं खारट पाणी, गरम रेती आणि काठावर वाळत घातलेल्या कोळणींच्या रंगीबेरंगी ओढण्या.

पुढे शिकत असतांनाच वयाच्या तेराव्या वर्षी एका छोट्याशा नोकरीसाठी मलबार हिलला जातांना चौपाटीचा समुद्र रोज दिसत असे. हळू हळू ती त्याच्याकडे ओढली जाऊ लागली. भरतीच्या वेळी लाटांशी खेळणारी माणसं पाहिली की तिलाही वाटे आपणही जावं लाटांशी खेळायला. पण त्याला दुरून पहाण्यातच समाधान मानावं लागे. नंतर कामानिमित्त तिला तिथेच रहावं लागलं कुटुंबापासून दूर इतक्या लहान वयात. पण त्या कठीण, एकाकी काळात तिला त्याचाच आधार असे. तिला दिलेल्या खोलीतून तो दिसत राही. कुणीतरी आपलं जवळपास आहेसं वाटे. रात्री त्या परक्या घरात झोप येईनाशी झाली की ती खिडकीपाशी जाई. अंधारात समुद्र दिसत नसला तरी त्याची गाज ऐकू येई. आईने थोपटून निजवावं तसं वाटे ती गाज ऐकली की. ते सगळे दिवस त्याच्याकडे बघत बघत ढकलले तिने.

पण तिथून गेल्यावरही त्याने तिची पाठ सोडली नाही. तिच्या महाविद्यालयाच्या पाठच्या बाजूला गर्जत तिला हाका मारत तो राहिलाच सोबत. कमावता कमावता शिकत असतांनाही अधूनमधून वेळ काढून ती जात राहिली त्याच्या भेटीला. जगण्याच्या लढाईतून उसंत मिळाली की त्याच्याकडे धावत राहिली. प्रियकरासोबत असतांनाही तिचं लक्ष त्याच्याकडेच असे.

संसाराचा रगाडा हाकतांना थकून जायला होई. पण कामावर जातांना पाच मिनिटांचा त्याचा सहवास तिला बळ देऊन जाई. अर्थात मनसोक्तपणे त्याच्या लाटांचा खेळ पहाणं, त्या लाटा झेलत चिंब होणं हे सगळं जमत नसे. तसं तर कार्यालयाच्या काही खिडक्यांमधूनही दिसायचा तो. लपंडाव खेळत असल्यासारखं वाटायचं. तिला नेहमी कामासाठी जावं लागे, तिथल्या खिडकीवर तर व्हिनिशियन ब्लाइंड्स असत. तिथून त्याचं ओझरतं दर्शन घ्यायला ती हळूच काम पुरं होईपर्यंत व्हिनिशियन ब्लाइंड्स किलकिली करून पहात राही.

……..

निवृत्त होणाऱ्या डायरेक्टरने सुंदरमला आणि तिला बोलावल्याचा निरोप आल्यावर ती सुंदरमसोबत निघाली. हाय हॅलो झाल्यावर काय चाललंय हा प्रश्न आला नि सुंदरम सुटलाच. मर्जरनंतर नव्या पेपॅकेज आणि सर्विस कंडिशन्सचं हार्मनायझेशन कसं आपण करतोय, त्यामागे आपला काय विचार होता, केवढा अभ्यास होता इ.इ. तिच्या लक्षात आलं की आपलं नाव घ्यायचं टाळतोय हा. मीही होते त्या टीममध्ये असं सांगायचं मनात येऊनही ती गप्पच बसली खिडकीबाहेर पहात. असे श्रेय न मिळण्याचे प्रसंग बरेचदा येऊन गेले होते, स्वतःची टिमकी वाजवणं जमत नाही त्यांचं हेच होतं. मग डायरेक्टरला शुभेच्छा देऊन निघेपर्यंत ती खिडकीबाहेरच पहात राहिली.

………

त्या रात्री अंगलगट नको वाटत होती, थकल्याने झोपून जावंसं वाटत होतं. पण मग तिच्या लक्षात आलं की अलिकडे आपलं हे रोजचंच झालंय. त्याने काय करावं मग. रोज आपली इच्छा का मारावी. मग मनाविरूद्ध प्रतिसाद देता देता तिला कळलं की आपल्यालाही हवं असतं की हे.

तिचं एक स्वप्न होतं, मरायचं असेल तेव्हा सरळ समुद्रात चालत जायचं. पण एकदा ती नवऱ्यासोबत खोल समुद्रात पोहायला गेली आणि बुडता बुडता वाचली. नाकातोंडात पाणी गेल्यावर अगदी घाबरीघुबरी झाली. मग अशी न पेलवणारी स्वप्नं पहायची सुद्धा नाहीतसं तिनं ठरवलं. काही दिवस तर समुद्रात तिनं पाऊलही टाकलं नाही. पण हळूहळू पूर्वीची ओढ परतली जरा नव्या जोमानं. सतत त्याचा सहवास हवासा वाटू लागला. त्याच्या जवळ बसावं, त्याचा आवाज ऐकत रहावा, त्याचं रूप डोळ्यात साठवत रहावं असं वाटे. तसा तो तिच्या जवळपास राहिलाच सतत.

या नव्या घरात ती आली तेव्हा तिचं हे वेड दुरून न्याहाळणाऱ्या एका मित्रानं तिला म्हटलं, “इथून खाडी दिसत्येय म्हणजे तुमचा लाडका आहेच की हाकेच्या अंतरावर.” खरं होतंच ते. अगदी मनात आल्या आल्या नसलं तरी फारच अनावर झालं तर पर्वताने महंमदाकडे जावं तशी ती त्याला भेटायला जाऊ शकत होतीच की.

पण अनिकेतच्या बाबतीत तिला असं जाणं का जमलं नाही? तिला नेहमीच कल्पना होती त्याचं तिच्यावर प्रेम आहे त्याची. पण तिने आधीच निवड केली होती. त्यामुळे त्याला प्रेम तर ती देऊ शकत नव्हती पण त्याला अधूनमधून भेटू तर शकत होती. ते तिने नेहमीच का टाळलं? त्याच्या अकाली मृत्यूनंतर तिला हे नेहमीच डाचत राहिलं. पण आता काही करता येण्याजोगं नव्हतं.

……

आपल्या लाडक्याला ती कधी विसरेल असं तिला कुणी सांगितलं असतं तर तिचा विश्वासच बसला नसता. पण तिची दोन्ही मुलं इतकी गोड होती की त्यांना वाढवता वाढवता खरंच विसरली ती त्याला. खरं तर मुलाच्या पहिल्या वाढदिवसाला ती दोघं त्याला समुद्रावर घेऊन गेली. आपलं हे वेड त्याच्यातही रूजावं असं वाटत असावं कुठेतरी. तो खूप लहान होता. पाण्यापेक्षाही तो मुठीतून रेती उधळण्यात रमला. पुढेही वाळूचं घर बनवायला त्याला फार आवडे पण तो पाण्यात कधी उतरलाच नाही.

मुलांसोबत खेळता खेळता तीही एक मूल झाली हसरं, खेळकर, आनंदी. त्यांच्यासोबत डोंगरावर जाता जाता सागराकडे पाठ फिरवली तिने. पार विसरूनच गेल्यासारखी वागत राहिली.

मग मुलं मोठी झाल्यावर तर जबाबदारीच्या जाणीवेतून ती कामात खूप बुडून गेली. मुलांचं भवितव्यच तेवढं नजरेसमोर होतं. आता ती खिडकीतून बाहेर पाही तेव्हा काळोखात काहीच दिसत नसे. काचेच्या बंद खिडक्यांतून त्याची गाजही कानावर पडत नसे. उशिरा थकून घरी आल्यावर कामं उरकली की दुसरं काही सुचतच नसे. अंथरूणाला पाठ टेकताच डोळे मिटत.

तिला पूर्वी एक स्वप्न कायम पडे. कापसाचे पुंजके पुंजके वहात येऊन त्यांचा ढीग तिच्या छातीवर जमा होत होत त्याखाली ती गुदमरून जाऊन दचकून जागी होई. आताशा हे स्वप्न पडत नसे तिला. त्याची जागा कधी कधी पडणाऱ्या स्वप्नाने घेतली. ती सरळ चालत निघालीय जशी काही खाली सपाट जमिनच आहे. पण ती चाललीय मात्र सरळ थेट समुद्रात. खोल खोल आत आत. पण एकाएकी मागून तीरावरून हाका यायला लागतात. लहान मुलाच्या आवाजात. मग ती परत फिरते. हळू हळू लाटांशी झगडत किनाऱ्याकडे परतायला सुरूवात करते..

….

आता ती मोकळी झालीय सगळ्या जबाबदाऱ्यांतून. दोघंच असतात घरात एकमेकांच्या सहवासात. नवरा त्याच्या कामात व्यग्र असतो. तिनेही बरेच व्याप लावून घेतलेत मागे. तरीही संथ आहे सगळं. आपल्याच ठाय लयीत. समोर खिडकीतून दूरवर खाडी दिसत असते. काहीतरी खुणावतंय तिला खाडीच्या पाण्या आडून.