जयपुरची खादाडी

मागे २०११ मध्ये सवाई माधोपुरला गेलो होतो, रणथंबोरच्या जंगलाची सफर करायला. तेव्हा शेवभाजी, शेवटमाटर, दालबाटी चुरमा हे राजस्थानी पदार्थ फार मनापासून खाल्ले होते. मला केर सांग्रीची भाजीही चाखून पहायची होती -निव्वळ हा काय प्रकार आहे या कुतूहलापोटी. एका मारवाडी मैत्रिणीने सांगितलं की जयपुरला नक्की मिळेल. आणि अगदी पहिल्याच दिवशी आम्हाला ट्रायडंटमध्ये केर सांग्रीची भाजी तर मिळालीच पण क्षितिजला लाल मांस खायचं होतं तेही मिळालं.

केर एक प्रकारचं बोरासारखं, छोट्या बोराएवढं फळ असतं आणि सांग्री एक प्रकारच्या शेंगा असतात. हे दोन्ही वाळवंटात उगवतात. उन्हाळ्यात तापमान फार वाढलं की काही उगवणं कठीण होतं. त्यामुळे केर आणि सांग्री वाळवून ठेवून त्यांचा साठा केला जातो. भाजी नसेल तेव्हा वाळवलेल्या केरसांग्रीला पाण्यात काही काळ भिजवून ठेवल्यावर त्या वापरण्यासाठी तयार असतात. वाळवण्याच्या प्रक्रियेत काही कचरा भाजीत राहून गेला असेल तर तो नीट साफ करावा लागतो. मग दोन्ही वाफवून बाजूला ठेवून फोडणीत हिंग, जिरं, बडीशेप, लाल सुक्या मिरच्या, घालून त्यात वाफवलेली भाजी घातली जाते. मग त्यात धणेपूड, मिरचीपूड, हळदपूड, गरम मसाला, आमचूर घालून नीट ढवळून फेटलेलं दही, मनुका, मीठ घालून वाफ आणली की झाली भाजी तयार. राजस्थानातल्या जेवणात तेल बरंच आढळलं , तसंच ते या भाजीतही बरंच होतं. पण आवडली आम्हाला.

मग दुसऱ्या दिवशी दालबाटी, चुरमा खायला गेलो. सवाई माधोपुरला जो चुरमा खाल्ला होता तो गव्हाच्या बाटीचा होता. इथे आम्हाला दोन प्रकारच्या बाटीचा चुरमा खायला मिळाला -गव्हाच्या आणि बाजरीच्या. मला बाजरीचा चुरमा अधिक आवडला. त्यात गूळ होता. त्यासोबत कढीपकोडी, भात आणि अप्रतिम असं मिरचीचं लोणचं. सोबत लस्सी. मजा आ गया.

गट्टेका साग आधी सवाई माधोपुरला खाल्लं होतं त्यापेक्षा इथलं वेगळं होतं. तिथलं दही, बेसन आणि धणेपूड, बडीशेपपूड टाकून बनवलेलं होतं, तर इथे कांद्याची आणि गरम मसाल्याची चव होती.

ठिकठिकाणी पवित्र भोजनालय अशा पाट्या होत्या. त्याच्या आधी अर्थातच मालकाचं नाव होतं. जसं की श्याम पवित्र भोजनालय, शर्मा पवित्र भोजनालय वगैरे. तेव्हा आमच्या चालकाला विचारलं की हा काय प्रकार आहे ? इथे कांदालसूणविरहीत भोजन मिळतं का? तर त्याने सांगितलं असं काही नाही. फक्त मांसाहार शिजवला जात नाही तिथे म्हणून पवित्र भोजनालय म्हणतात.

चांगली प्रतिष्ठित उपाहारगृहं असोत की रस्त्यावरचे ठेले, न्याहारीसाठी काही ठराविक पदार्थ सगळीकडे दिसत होते – पराठा, पोहे, पुरी भाजी, कचोरी. काही ठिकाणी प्याज कचोरी, मावा कचोरी असे फलक दिसले. कुतूहलापोटी शेवटच्या दिवशी जयपुर स्थानकाजवळच्या सुप्रसिद्ध ‘रावत कचोरी’मध्ये कचोरी खायला गेलो. माव्याचं सारण भरून मग तळून केलेली कचोरी पाकात बुडवून तिच्यावर सुक्या मेव्याचे काप घालतात. ही फार गोडमिट्ट होती. प्याज कचोरीत कांदा फार नव्हता, बटाटाच अधिक होता. पण जे काही होतं ते फार चविष्ट होतं.

तिथे बाजारात सर्वत्र पेरु विकायला ठेवलेले दिसले. अगदी रात्री नऊ वाजताही भाज्या, फळं विकणारे बाजारात दिसत. सवाई माधोपुरला पेरुच्या बागा पाहिल्या होत्या आणि पेरु घेतले होते ते फार गोड निघाले होते. म्हणून इथेही पेरु घेतले. ओवी रणथंबोरमध्ये वाघांच्या कॉरिडॉरवर काम करीत असतांना तिने तिथल्या ओबेरॉयच्या शेफकडून भरलेल्या पेरुची रसभाजी शिकून घेतली होती आणि माझ्या वाढदिवसादिवशी करुन डब्यात भरून दिली होती. ती भाजी करायची ठरली. त्यासाठी बारीक चिरलेलं आलं,लसूण, हिरवी मिरची तेलावर परतून त्यात कुस्करलेलं पनीर आणि दरदरीत वाटलेला सुका मेवा आणि मीठ त्यात टाकून परतून घ्यायचं. मग ते सारण भरल्या वांग्यासाठी चीर देतो त्याप्रमाणे चीर दिलेल्या पेरुत भरायचं. ते पेरु तुपावर परतून घ्यायचे. एका बाजूला कांदा टोमॅटोचा मसाला करून वाटून घ्यायचा. त्यात धणेपूड आणि वेलची, दालचिनी, लवंग इतकेच मसाल्याचे पदार्थ बारीक वाटून टाकायचं, आल्या लसणाचं वाटण टाकायचं. फोडणीत एक दालचिनी, दोन लवंगा, चार वेलच्या, किंचित हळद टाकून त्यात कांदा टोमॅटोचा मसाला नीट परतून घ्यायचा. त्यात भरलेले पेरु टाकायचे. सारण उरलं असल्यास तेही टाकायचं. सर्व नीट परतून हवं असल्यास थोडं पाणी आणि चवीनुसार मीठ टाकून शिजवायचं. झाली की भरल्या पेरुची भाजी तय्यार.

तिथे सर्वत्र गजक मिळेल अशा पाट्या होत्या. गजक हा तीळाच्या किंवा शेंगदाण्याच्या सपाट चिक्कीचा प्रकार आहे. त्यासाठी आधी जाड बुडाच्या कढईत तीळ भाजून घेतले जातात. ते थंड झाल्यावर त्याची पूड करुन गूळाच्या किंवा साखरेच्या पाकात नीट मिसळून एखाद्या थाळीला तूप लावून त्यावर पातळ थर दिला जातो. हे फार वेगवेगळ्या आकारात मिळतात. आम्हाला मिळालेला गजक अळूवडीसारख्या आकाराचा होता. त्याशिवाय तिथला प्रसिद्ध घीवरही घेतला. या घीवरमध्ये तिथे रबडी टाकून खातात. अर्थात अशी खादाडी केल्यावर वाढलेलं वजन पुन्हा मूळ पदावर आणण्यासाठी इथे आल्यावर व्यायाम करणं भागच आहे म्हणा.