केप टाऊन दैनंदिनी -७
शाळेत शिकतांना केप ऑफ गुड होपविषयी बरंच वाचून उगाचच एक आकर्षण निर्माण झालं होतं. पण आयुष्यात कधी आपण प्रत्यक्ष तिथे जाऊ असं मात्र वाटलं नव्हतं. त्यामुळे केप ऑफ गुड होपला आपण जायचंय असं क्षितिजने सांगितल्यावर फार आनंद झाला.

केप ऑफ गुड होप हे आफ्रिकेचं दक्षिणेकडचं तसंच अटलांटिक महासागर आणि हिंदी महासागर यांना विभागणारे टोक असा सर्वसाधारण समज होता. (पण केप अगुल्यास हे ते सर्वात दक्षिणेकडचं टोक हे आता माहीत झालेलं आहे.) १४८८ मध्ये या भूशिराचा शोध बार्थोल्योमु या डच सागरसाहसवीराने लावला. त्याने त्याचं नामकरण Cabo tormontoso म्हणजे वादळी भूशिर असं केलं होतं. भारत आणि अतिपूर्वेकडच्या देशांशी व्यापार करण्यासाठी पूर्वेकडे जाणारा समुद्री मार्ग सापडल्यामुळे आशादायक वातावरण निर्माण झालं. म्हणून पोर्तुगालचा राजा दुसरा जॉन दुसरा याने नंतरच्या काळात या भूशिराला केप ऑफ गुड होप असं नाव ठेवलं असं म्हणतात. १४९७ साली वास्को द गामाही तिथे वेगळ्या दिशेने पोचला. पोर्तुगीज सरकारने ते दोघे ज्या बाजूने तिथे पोचले त्या दोन्ही ठिकाणी दोन दिशादर्शक क्रूस उभारले आहेत -डायस क्रॉस आणि द गामा क्रॉस.

हिंदी महासागराकडून येणारे उष्ण प्रवाह आणि अटलांटिककडून येणारे थंड प्रवाह एकमेकांत मिसळण्याचा बिंदू केप ऑफ गुड होप आणि केप अग्युल्यास यांच्या मध्ये बदलत रहातो.

असं हे ऐतिहासिक ठिकाण बघण्यासाठी आम्ही मायकलच्या गाडीने निघालो. वाटेत LLandudno Beach पाहिला. आम्ही फार अल्प काळासाठी थांबलो होतो. फार सुंदर परंतु खडकाळ किनारा. आजूबाजूला मोठे खडक आणि डोंगर यांनी वेढलेला. इथे सर्फिंग करणं खडकांमुळे कदाचित धोक्याचं असेल, पण तरीही सर्फिंगची फळी हातात घेऊन तिथे जाणारे येणारे लोक बरेच दिसत होते.

त्यानंतर हाऊट बे (Hout Bay) ला थांबलो. इथे लोक सर्फिंगसाठी येतात. तसंच इथे ताजे मासे खाण्याचीही बरीच ठिकाणं आहेत. किल्ला सदृश बांधकामं दिसली आणि काही जुन्या तोफाही इथे आहेत. केप टाऊनमध्ये इतरत्र दिसले तसेच मोठमोठे सील मासे इथेही दिसले. एक माणूस तर पाळीव प्राण्यासारखा एका सीलला मासे भरवत होता आणि तो त्याला पाहिजे त्याप्रमाणे छायाचित्रासाठी पोझही देत होता. इथेही फार थोडा वेळ थांबून उशीर होईल म्हणून आम्ही निघालो.


केप ऑफ गुड होप नेचर रिझर्व्ह बरंच विस्तृत परिसरात पसरलेलं आहे. आत शिरायला बरीच मोठी रांग होती. त्यामुळे हळूहळू पुढे सरकतांना जवळपासची झुडूपं न्याहाळत होतो. साधारणपणे हजाराहून अधिक छोट्या झुडूपांच्या जाती इथे आढळतात ज्या अन्यत्र सहसा दिसत नाहीत. जोरात वाहणारे वारे आणि वालुकाश्माची (sandstone) माती, दोन समुद्रांच्या पाण्याचं मिश्रण या सगळ्यांमुळे अशा प्रकारची झुडूपं तयार होतात असं म्हटलं जातं.

वाटेत काही पक्षी, प्राणी दिसत होते. तिथे पक्ष्यांच्या २५० हून अधिक जाती आढळतात. आम्हाला पाणकावळे, वटवट्या, साळुंख्या (starling) सगळीकडे दिसत होते. साळुंख्या तर फार धीट होत्या, क्षितिजचा खाऊ हिसकावून घ्यायला आल्या होत्या. काही हरणं, गायीसारखा दिसणारा इलँड, डासी हा उंदीरसदृश प्राणी दिसले. एक बबून तर अगदी गाडीसमोरून गेला.

उंच कड्यावरून केप ऑफ गुड होपचं भूशिर न्याहाळण्यासाठी वर चढून जाता येतं. क्षितिज वर चढून गेला होता तो त्याच्या मते एक अविस्मरणीय अनुभव होता. पण जर पायी वर चढून जायचं नसेल तर Flying Dutchman Funicular ने माणशी अंदाजे २५० रूपये देऊन जाता येतं. साधारण तीन मिनिटात आपण वर पोहोचतो. तिथूनही काही लोक अजून वर चढून जातात. चंदर, ओवी, क्षितिज तिघंही गेले होते. मी गुडघ्याच्या दुखापतीमुळे तिथेच थांबले. पण तिथूनही फार सुंदर दृश्य दिसत होतं. केप ऑफ गुड होपचं राकट सौंदर्य, तिथला भणाणता वारा अनुभवता येत होता. खाली दिसणारा उसळता समुद्र, पांढऱ्याशुभ्र वाळूने नटलेला डायस किनारा, कडे, द्वीपकल्पांची किनारपट्टी, उडणारे समुद्रपक्षी हे सगळं मिळून एक राकट, भव्य दृश्य उभं करतं. योग्य वेळी गेल्यास स्थलांतर करणारे देवमासेही दिसतात. पण आम्ही गेलो होतो मार्चमध्ये त्यामुळे आम्हाला काही दिसले नाहीत. तिथे एका बुडालेल्या जहाजाचे अवशेषही पाहता येतात. आम्ही तिथे काही काळ घालवला आणि पुन्हा कधी येता य़ेईल बरं इकडे असा विचार करीत तिथून निघालो.

