माझ्या वडीलांना स्वयंपाक येत असावा. पण मी कधी त्यांना स्वयंपाक करतांना पाहिलं नाही. स्वयंपाकघरात एक गोष्ट मात्र ते फार प्रेमाने करीत आणि त्यांनी ती तितक्याच प्रेमाने आम्हाला शिकवली. ती गोष्ट म्हणजे चहा. त्यांची अशी चहा करायची विशिष्ट पद्धत होती. ती अगदी पायरीपायरीने करावी लागे. आधी कपाने नीट मोजून चहासाठी पाणी घ्यायचं. ते उकळल्यावर त्यात चमच्याने मोजून साखर टाकायची. पाणी उकळून ती विरघळली की लगेच चमच्याने मोजून त्यात चहाची पूड टाकून लगेच आच बंद करून भांड्यावर झाकण ठेवायचं. दोन मिनिटं चहा मुरू द्यायचा. दूध वेगळं उकळून घ्यायचं मधल्या काळात. चहा मुरल्यावर आधी दूध गाळून घ्यायचं कपात. मग त्यावर गाळलेल्या चहाची गरम धार धरायची. कप भरला की मजेने चव घेत रिकामा करायचा. वडीलांना जाऊन तेवीस वर्ष झाली. पण माझ्या घरी अजूनही याच पद्धतीने चहा केला जातो.
त्यानंतर अर्थात मी बऱ्याच वेगवेगळ्या प्रकारचे चहा प्यायले. मुलामुळे ग्रीन टीचीही आवड लागली. मुंबईत चर्चगेट स्थानकाजवळच्या रेशम भवनमध्ये तळमजल्यावर टी हाऊस होतं. तिथे वेगवेगळ्या प्रकारचा चहा प्यायला तर मिळतच असे पण तिथे वेगवेगळ्या प्रकारची चहाची पूड विकतही मिळत असे. मॉरिशसला मात्र चहा पिणं नकोसं वाटे. कारण चहा फार पातळ असेच शिवाय त्यात व्हॅनिला टाकलेलं असे. पण दक्षिण आफ्रिकेतल्या केप टाऊनला मिळालेला रुई बोस चहा साखर, दूध न टाकताही फार छान लागे.
पण आजही वडीलांकडून जो चहा करायला शिकले तो प्यायल्यावरच चहा प्यायल्यासारखं वाटतं.
