
अलीकडे एका मालिकेत कामावर वेळेवर न पोचल्याने काही लोकांना मेमो देण्यात येतो असं पाहिलं. मला तर निवृत्त होऊन इतकी वर्षं झाली तरी अजूनही मी वेळेवर पोहोचण्यासाठी कसरत करीत चाललेय आणि वाटेत अनेक अडथळे येताहेत अशी स्वप्नं पडतात. मुंबईसारख्या शहरात वाहतूक व्यवस्थेवर इतके ताण असतात की खरंच कसरत करावी लागते. मला दहिसरवरुन कफ परेडला पोहोचायला आधी बस किंवा रिक्षा, मग लोकल, मग पुन्हा बस, शेअर टॅक्सी किंवा साधी टॅक्सी करुन जावं लागे. तेही सहजासहजी मिळत नसेच. प्रत्येक वाहनासाठी इतका आटापिटा करावा लागे की विचारुन सोय नाही. त्यातून दक्षिण मुंबईत मंत्रालय असल्याने वेगवेगळे मोर्चे, निदर्शनं, एखाद्या मंत्र्याचं, आमदाराचं निधन, सरकारने बोलावलेल्या परदेशी किंवा देशी नेत्यांचं आगमन या सगळ्यांमुळे वाहतुकीचा अर्धा तास ते तासभरही होणारा खोळंबा ही एक अडचण असे. कधी कधी घाईत आपण टॅक्सी करावी तर विचित्र अनुभव येत. एकदा लोकल काही कारणाने रखडल्यामुळे मी आणि एका सहकारी मुलीने टॅक्सी केली. जेव्हा यू टर्न घेतांना त्या चालकाने गाडी फुटपाथवर चढवली तेव्हा कुठे ध्यानात आलं की तो प्यायलेला होता. बरं तो आरडाओरडा करुनही उतरु देईना. जीव मुठीत धरुन तो प्रवास केला. त्याने लांबून नेल्याने पैसेही अधिक खर्च झाले शिवाय उशीर टळला नाहीच. एकदा असाच एक चालक सगळ्या गाड्यांना हात करुन आपल्या पुढे जाऊ देत होता. त्याला म्हटलं बाबा रे कामावर जायला उशीर होतोय म्हणून तुझी टॅक्सी घेतली. तर पठ्ठ्याने “अईसा का? हम को लगा घूमने निकली हो” असं म्हटल्यावर त्याला सांगितलं कळलं ना आता तरी नीट चल बाबा. तर साहेबांनी “हम नही चलाता हूँ” असं म्हणत स्टिअरींग व्हीलवरचे हात सोडून दिले. इतकं सगळं करुन उतरल्यावरही आम्ही पळत पळत वीसाव्या मजल्यावर पोचायला उद्वाहनाच्या रांगेत, मग तिथून विभागात पोचल्यावर संगणक सुरु करायला वेळ लागे, तो सुरु करायचा वेगळा परवलीचा शब्द, मग हजेरीच्या ठिकाणचा वेगळा परवलीचा शब्द, पुन्हा तिथे प्रत्येकाचा वेगळा कर्मचारी क्रमांक आणि पुन्हा एक परवलीचा शब्द असं सगळं करुन आपली हजेरी लागली की हुश्श करायचं.
आता वाटतं इतका ताण घ्यायची काय गरज होती कोण जाणे. टाळेबंदीच्या काळात निदान हे तरी टळलं म्हणून अनेकांना बरं वाटलं. शिवाय कामावर वेळेवर जायचा उटारेटा न करताही वेळेवर काम संपवता येतं हेही कळलं. मग का इतकी धावपळ करतो आपण? त्या मालिकेतल्या माणसासारखा आपलाही अहंकार आड येतो का की आपण वेळेवर जातो असा आपला रेकॉर्डच आहे? कित्येक लोक मी पाहिलेत जे वेळेवर कधीच पोचत नसत तरीही त्यांचं काही बिघडलं नाही. तेही माझ्यासारखेच निवृत्त झाले, त्यांनाही पेन्शन मिळाली, थोडी कमी असेल कदाचित. पण ते रोज उशिरा जात हे आता त्यांनाही आठवत नसेल. हे तर मान्यच की वेळेवर जाणं – विशेषतः जिथे ग्राहकांशी संबंध येतो तिथे तर नक्कीच- अत्यावश्यक आहे. पण त्यासाठी किती मानसिक ताण घेतो आपण. तसंही आमच्याकडे कामावर यायची वेळ निश्चित असली तरी घरी जायची वेळ ठरलेली नसे. ती फक्त कागदोपत्रीच असायची. घरी पोचायला माझ्यासारख्या अनेकांना रात्रीचे दहा अकरा वाजत. कौटुंबिक आयुष्याचा पुरता बोजवारा उडे. जिथे अशा प्रकारे कर्मचाऱ्यांना राबवून घेतलं जातं तिथे ग्राहकांशी संबंध येत नसेल अशा विभागातल्या लोकांसाठी कामाचे तास लवचिक (flexi hours) ठेवायला काय हरकत आहे? जिथे ग्राहकांशी संबंध येतो तिथेही जास्तीचे कर्मचारी घेऊन हा प्रश्न मिटवता येऊ शकतो जेणेकरुन वेळेवर येणं आलटून पालटून बंधनकारक असेल. पण सध्या सगळीकडे कर्मचारी कपात, खर्चात कपात असं धोरण असल्याने कंत्राटी कामगार घेतले जातात आणि त्यांना फारशा सवलती न पुरवता कसंही राबवून घेता येतं. टाळेबंदीच्या काळात घरून काम करण्याचा पर्याय उपयोगी ठरतो खरं तर हे सगळ्यांच्या लक्षात आलं. शिवाय ज्यांना लोकल किंवा बसने जाण्याची परवानगी नव्हती पण कामावर जावंच लागे असे कर्मचारी एकाच परिसरात रहाणाऱ्या सहकाऱ्यांसोबत गाडीने एकत्र जात. हे दोन्ही पर्याय पुढेही उपलब्ध असले तर पर्यावरणाची हानिही टाळता येईल
आता टाळेबंदीच्या काळातल्या बदलांमुळे व्यवस्थापनाने काही धडे घेऊन या सगळ्यात बदल केले तर अनेक कर्मचाऱ्यांची मानसिक तणावातून सुटका होईल. माझ्या आठवणीप्रमाणे एक्झिम बँकेने या दशकाच्या सुरुवातीलाच फ्लेक्सी आवर्स ही संकल्पना राबवली होती. जे उशिरा कामावर दाखल होत, त्यांना तितकंच उशिरापर्यंत थांबावं लागे. जे लवकर ये त्यांना लवकर जाण्याची मुभा असे. अशा प्रकारे वेळेच्या आधी आणि वेळेवर येणारे असे दोन्ही वर्गातले लोक हजर असल्याने फारशी अडचणही होत नसे. ही व्यवस्था तिथल्या कर्मचाऱ्यांना खरंच सोयीची ठरली असं तिथं काम करणाऱ्या मैत्रिणीने सांगितलं.
दुसरेही काही ताण असतात ते आपणच निर्माण करतो कधी कधी. एकदा माझ्यावर लेखा विभागातल्या परकीय चलनात देण्यात येणाऱ्या कर्जाच्या परतफेडीसंदर्भात एक सॉफ्टवेअर तयार करुन घेऊन ते अंमलात आणण्याची जबाबदारी सोपवण्यात आली. माझं रोजचं काम करुन हेही काम तातडीने करायचं होतं. सॉफ्टवेअर करुन घेतलं पण अंमलात आणायचं कामही मी त्या कामासारखं एका कोपऱ्यात बसून माझं मीच करायचं ठरवलं. आधीचं काम करतानांचा ताण होताच तरीही मी कशाला दुसऱ्यांना यात ओढा, माझं मी करीन म्हटलं. पण आमच्या वरीष्ठांनी मला समजावलं. ते म्हणाले, “असंही हे काम नंतर सर्वांनी आपापल्या कंपन्यांसाठी करायचं आहे. आत्ताच सगळ्यांना या कामात गुंतवलं तर ते लवकर पुरं होईल, त्या निमित्ताने प्रत्येकाला त्यातल्या खाचाखोचा कळतील त्याची त्यांना मदतच होईल.” अर्थात इतरांनी मला मनातल्या मनात शिव्या दिल्या असल्या तरी नंतर त्यांनाही हे कळून चुकलं की हे आधी केलं ते बरं झालं. पण कधी संकोचामुळे, कधी फुकटच्या अहंकारापायी, कधी भीतीपोटी इतरांना कामात सहभागी करुन घेणं किंवा काम वाटून देणं आपण टाळतो. त्या वेळी ध्यानात येत नसलं तरी असं करुन आपण आपला ताण उगाचच वाढवित असतो हे आपल्या शरीराला, मनाला त्रास व्हायला लागला की आपल्या ध्यानात येतं.
तोच प्रकार काम नाकारण्याचाही. कधी कधी तात्पुरता का होईना नकार देणं आवश्यक असतो. मराठीत एक अश्लील म्हण आहे – भीडे भीडे पोट वाढे तसं व्हायला नको. नव्वदच्या दशकातली गोष्ट आहे. संगणीकीकरण ही तशी नवी गोष्ट होती अजूनही. कित्येकांचे संगणकाविषयी मजेदार समज असत. एकदा एक चांगला बुद्धीमान सहकारी मला म्हणाला, “पण मॅडम, कॉम्प्युटर कशी काय चूक करु शकेल?” म्हणजे आपण चुकीची विदा भरली तरी संगणकाची चूक होणारच नाही. संगणक जादूने काहीतरी करतो असाच समज असे. तसंच संगणीकीकरणाचा अर्थ भल्याभल्यांना नीट माहीत नसे. मी लेखा विभागात होते आणि माझ्याकडे परकीय चलनातल्या कर्जाचं काम होतं. जवळपास पाचशे कंपन्यांना दिलेली वेगवेगळी कर्ज, प्रत्येक कर्ज फेडण्यासाठी व्याजाचे, दंडाचे वेगवेगळे दर, वेगवेगळ्या अटी असं होतं. त्या कामाचं संगणीकीकरण झालं नव्हतं. माझ्या चमूतली माणसं ते हाती करीत. मोठाल्या खातेबुकात ते मांडून ठेवीत. आमचे महाव्यवस्थापक फार कडक शिस्तीचे होते. कर्जाचे हप्ते बुडवणाऱ्या कंपन्यांवर ते सतत नजर ठेवून असत. त्यासाठी दर आठवड्याला त्यांना आकडेवारी पुरवावी लागे. मी एक्सेलशीटवर इतक्या सगळ्या कंपन्यांचं काम हाती करुन ठेवीत असे. पण ते करायला वेळ लागे. आणि सोमवार जवळ आला की पोटात गोळा उठे. कारण साहेबांना सगळा तपशील द्यायचा असे. एवढी मोठी फाईल तयार व्हायला वेळ लागे. मी रविवारी काम करुनही पूर्ण होत नसे, कारण माझं रोजचं काम करुन मला हे करावं लागायचं. शेवटी एकदा मी धीर करुन त्यांना सांगून टाकलं की सर मला हे शक्य नाही. ते म्हणाले तुला काय करायचंय त्यात संगणकला फक्त आज्ञा द्यायची ना. तेव्हा मी त्यांना ते काम संगणकीकृत नाही तर हाताने कसं केलं जातं ते दाखवलं आणि त्यांना ते पटलंच शिवाय संगणीकीकरण तातडीने करुन घेण्यासाठी त्यांनी परवानगी दिली, तशा सूचना हे काम करणाऱ्या विभागाला दिल्या तेव्हा कुठे माझा जीव भांड्यात पडला. खरं तर हे मी सुरुवातीलाच करायला हवं होतं. पण आपण कुठे तरी कमी पडतोय असं वाटून अशा प्रकारची कृती हातून होत नाही. आपण फार कुशल आहोत हे सिद्ध करण्यासाठी ताकदीबाहेर आटापीटा करणारे कित्येक सहकारी अशा प्रकारे निराशेच्या गर्तेत गेलेले मी पाहिलेत. उपचार घेऊन ते त्यातून बाहेर पडले तरी त्यांची कारकीर्द नंतर पहिल्यासारखी होऊ शकली नाही हेही खरं. थोडासा ताण तुमच्या उत्कृष्ट कामगिरीसाठी आवश्यक असतो हे खरं. लवचिक असलं पाहिजे रबरासारखं. पण रबर फार ताणला की तुटतोच. तो किती ताणायचा हे समजून घेणं फार आवश्यक आहे.
