काल अशाच गप्पा मारतांना आम्ही लालबागला राहत होतो तिथल्या चाळीतल्या जिन्यांचा विषय निघाला. लालबागमध्ये चांगल्या चारमजली चाळी असत. मध्ये मोकळा चौक, चारी बाजूंनी खोल्या आणि एका बाजूला त्या खोल्यांकडे जाणारे जिने असत. हे जिने रहिवाशांनी तळमजल्यावरून पाणी वाहून नेल्याने निसरडे झालेले, अंधारलेले तर असतच, शिवाय त्यातले काही जिने कोपऱ्यावर वळतांना पायऱ्या त्रिकोणी आकाराच्या केलेल्या असत. त्यांना कठडाही नसे, आधाराला भिंतीला धरु पहाता येत नसे कारण त्या पिचकाऱ्यांनी रंगलेल्या, निसरड्या झालेल्या असत. संध्याकाळच्या वेळी छोटीशी कळशी घेऊन खारीचा वाटा उचलणाऱ्या माझ्यासारख्या सातआठ वर्षांच्या मुलीला भीती वाटे पडण्याची. अशा वेळी आमच्या जिन्याखालच्या जागेत बस्तान मांडलेला सायमन (ह्याला आबालवृद्ध सगळेच सायमन म्हणून हाक मारीत) मला धीर देई “घाबरु नको बेबी, मी हाय.” पण तरीही माझ्या मनातली भीती जात नसे. पण लपाछपी खेळायला ह्या जिन्यांचा खास उपयोग होई. काही माणसं घरातल्यांवर रुसून जिन्यावर जाऊन बसत. खास प्रसंगावेळी हे जिने स्वच्छ धुतले जात. तेव्हा त्यात भाग घ्यायला मजा येई. तेव्हा मी लहान मुलगी होते. आता जाणवतंय तेव्हा किती नववधू आल्या असतील ह्याच जिन्यांवरुन स्वप्नं पाहत. नंतर सासुरवाशीण झाल्यावर आपल्यासारख्याच सासुरवाशीणीला ह्याच जिन्यांवरुन पाणी आणता आणता सुखदुःखं सांगितली असतील. आम्हा सात बहिणींच्या पाठीवर भाऊ झाला तेव्हा हे जिने चाळीतल्या उत्साही लोकांनी धुवून काढून पताका लावून चाळ सजवली होती. अशी किती बाळं आनंद वाटत ह्या जिन्यांवरून आली असतील.
आमचं सदानंद निवास, आमचे एक आजोबा राहत ते अनंत निवास अशा बऱ्याच चाळीतले जिने असे असत. आमची मानलेली भावंडं राहत त्या हरी ओम निवासातले जिने मात्र चांगले होते. पण तिथे चौकात कचरा टाकण्याची पद्धत होती. त्यामुळे तिथल्या जिन्यांमध्ये कुबट वास पसरलेला असे. चिंचपोकळीकडून काळाचौकीकडे जाणाऱ्या रस्त्यावर माझी मैत्रीण अरुणा राहत असे. त्यांची चाळ छोटीशी एकमजली होती. अशा एकमजली चाळीही बऱ्याच असत. त्यांचे जिने सहसा लाकडी आणि तेही फार सरळसोट असत. इतके सरळसोट की जिना चढतांना पुढच्या पायरीला गुडघा घासला जाईल. ते जिने चढणं हे एक दिव्यच असे. आमच्या जवळच्या एका चाळीचे जिने मला फार आवडत. लोखंडी, नक्षीदार आणि गोल, वळत जाणारे ते जिने सुंदर दिसत. नंतर मोठेपणी कूपरेजवरुन कुलाब्याच्या बेस्टच्या कार्यालयाकडे जाणाऱ्या रस्त्यावर – पोलीस दल किंवा अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांच्या वसाहती होत्या, तिथे असे जिने पाहिले. दक्षिण मुंबईतल्या काही जुन्या इमारतींमध्ये ते दिसत.
मलबार हिलवरच्या हँगिंग गार्डनमधल्या म्हातारीच्या बुटात जायलाही असे वळणारे गोल जिने होते. तिथून वर जायला मज्जा येई. मुंबई विद्यापीठाच्या आवारातल्या राजाबाई टॉवरला असे जिने होते म्हणे. पण तिथे कधी जाताच आलं नाही.
आमच्या एल्फिन्स्टन महाविद्यालयातल्या भक्कम, दगडी, पण अंधारलेल्या जिन्यांना मस्तपैकी कोनाडे होते बसायला. तिथल्या अंधारात त्या कोनाड्यांमध्ये बसायला फार भारी वाटत असे. माझ्या काही कवितांचा जन्म ह्या जिन्यांच्या कठड्यांवर झालेला आहे. तिथं अंधारात बसून राहायला बरं वाटे
मी जिथे काही काळ काम केलं त्या ‘जनता साप्ताहिका’चं कार्यालय रिगल सिनेमामागे असलेल्या टुलोक रोडवरल्या नॅशनल हाऊसमध्ये होतं. तिथले जिनेही त्या प्राचीन इमारतीसारखे जीर्ण, लाकडी होते. आपण जिने चढायला लागलो की जिन्याच्या पायऱ्या करकर वाजत. एखाद्या दिवशी ह्या पायऱ्या तुटतील अशी भीती वाटे. पण साधारण दहा वर्षापूर्वीपर्यंत ते तसेच होते. आता ती इमारत पाडली गेली.
हळूहळू लालबागच्या चाळीही अशाच पाडल्या गेल्या की हे जिने आणि त्यांच्यासोबतच्या आठवणी, जगण्याची ती विशिष्ट शैली हे सगळंही लुप्त होईल.