केप टाऊन दैनंदिनी – ३

केप टाऊनच्या भटकंतीत एक गोष्ट ध्यानात आली की इथल्या घरांच्या बांधणीवर ब्रिटीश आणि डच शैलीचा प्रभाव आहे. इथे पूर्वी खूप पाऊस पडत असे असं म्हणतात. त्यामुळे की या प्रभावामुळे ते माहीत नाही, पण उतरत्या छपराची घरं अधिक आहेत. डच शैलीतली विशिष्ट प्रकारच्या गवताचं छप्पर उच्चभ्रू वस्तीतल्या बऱ्याच घरांवर आढळलं. घरांचे रंगही पांढरा, हस्तीदंती, फिक्कट तपकीरी असे खास अभिजात ब्रिटीश. सरकारने नेटीवांना जी घरं बांधून दिली तीही अशाच रंगांमधली होती, ती नंतर त्यांनी जरा रंगीत करून टाकली.

केप मलाय लोकांची वस्ती आम्ही पाहिली. ही वस्ती आशियाई लोकांची आहे. इथली घरं खास रंगीबेरंगी आहेत आणि वारसा म्हणून या वास्तू तशाच जतन केलेल्या आहेत.

नेटीवांच्या गरीब वस्त्यांमधली घरं जरी आपल्याकडल्या झोपडपट्ट्यांसारखी वीटा, पत्रा असं जे मिळेल ते वापरून केलेली असली तरी तिथे थोडे रंग होते. आम्ही जॅझ संगीताची मैफिल ऐकायला गेलो होतो त्या घराच्या बैठकीच्या खोलीला आतून चक्क भडक नारिंगी रंग होता.

फार उच्चभ्रू, अभिजात रंगांपेक्षा हे रंग अधिक आपले वाटतात, नाही?

केप टाऊन दैनंदिनी

दोन दिवसांपूर्वीच एका मित्राने केप टाऊनमध्ये पाण्याचं दुर्भिक्ष्य आहे आणि १९ एप्रिलपर्यंतच पाणी मिळेल अशी पोस्ट वॉट्स अपवर पाठवली. आम्ही तिथे असतांना तर तसं काही ऐकीवात आलं नव्हतं. तरीही पुन्हा क्षितिजला विचारलं तर तो म्हणाला की ते सगळं जुनंच लोक पुन्हा पाठवताहेत. इथं असं काही नाही.

आपल्या मराठवाड्यासारखं सतत तीन वर्षे पाऊस न पडल्याने २०१७ पासून तिथे पाण्याचं दुर्भिक्ष्य होतं. त्यावरून धडा घेऊन आता पाण्याचा वापर तिथे सावधपणे होऊ लागला आहे. आम्ही ज्या ‘निवारा आणि न्याहारी’ विश्रांतीगृहात उतरलो होतो, तिथे स्नानगृहात शक्यतो टब न वापरण्याची सूचना तर होतीच. त्याशिवाय आंघोळीचं गरम पाणी यायला थोडा वेळ लागतो, तोवर जे थंड पाणी येतं, ते बादलीत साठवावं असंही सांगितलं होतं. ते बादलीतलं पाणी ते झाडांना घालण्यासाठी, शौचालय स्वच्छ करण्यासाठी वापरत होते. बाहेर फिरायला गेल्यावर स्वच्छतागृहात शौचालयाच्या टाकीला पाणी होतं, पण हात धुण्यासाठी बऱ्याच ठिकाणी नळाला पाणी सोडलेलं नसे. त्याऐवजी हात निर्जंतुक करणारा द्रव वापरासाठी ठेवलेला असे. असं असलं तरी हे नमूद करायला हवं की कुठेही अस्वच्छता आढळली नाही.  घरांमध्ये स्वच्छतेचं काम करणाऱ्या, सार्वजनिक ठिकाणी स्वच्छता करणाऱ्या सफाई कर्मचाऱ्यांनाही सगळी आयुधं पुरवलेली दिसली. झाडी प्रचंड प्रमाणात असूनही कुठे पालापाचोळा खाली पडलेला दिसला नाही. आपल्याला त्यांच्याकडून खूप काही शिकण्यासारखं आहे हे जाणवलं. अर्थात आम्ही सर्वसाधारणपणे प्रवासी फिरतात अशा ठिकाणी गेलो होतो. एकदा जॅझ संगीत ऐकायला गुग्ज भागात गेलो होतो. तिथेही गलिच्छपणा आढळला नाही. पण एतद्देशीयांच्या अशा गरीब वस्त्या ‘अनधिकृत’ मानल्या गेल्याने तिथल्या लोकांना नियमित पाणीपुरवठा होतच नाही म्हणे. तरीही ते कसं काय आपलं पाणी मिळवत असतील काय जाणे.

केप टाऊन दैनंदिनी १

दक्षिण आफ्रिकेतल्या केप टाऊन शहरातल्या नऊ दिवसांच्या वास्तव्यात ‘द ओव्हल बेड अँड ब्रेकफास्ट’ हे आमचं दुसरं घर बनलं होतं. क्षितिजचं म्हणजे आमच्या लेकाचं घर जरा लहान आहे म्हणून आणि काही तांत्रिक कारणासाठीही आम्ही इथे रहायचं ठरवलं. शिवाय क्षितिजच्या घरापासून ते चालत तीन मिनिटांच्या अंतरावर होतं. माइक आणि लूइस हे साधारण आमच्याच वयाचं दांपत्य ‘द ओव्हल बेड अँड ब्रेकफास्ट’ त्यांच्या राहत्या बंगल्याच्या उरलेल्या भागात चालवतं. अत्यंत स्वच्छ, प्रशस्त खोल्या, त्यात लुइसने काढलेली चित्रं जागोजागी टांगलेली (लुईस ही हौशी चित्रकार आहे. तिची फुलदाण्यांची चित्र आपल्या बी.प्रभांच्या चित्रांची आठवण करून देतात.) प्रत्येक खोलीबाहेर एक अंगण, अंगणात फुलझाडं लावलेली. बाथरूममध्ये साबण, शांपूसारख्या गोष्टींसोबत गरम पाण्याची पिशवी ठेवलेली पाहून मला फार बरं वाटलं. पण सुदैवाने त्या पिशवीचा वापर करण्याची वेळ आली नाही.

खोलीसमोरच्या अंगणातल्या झाडांवर वेगवेगळे पक्षी किलबिलत असत. नक्षीदार लोखंडी खुर्चीवर बसून शांतपणे एखादं पुस्तक वाचायला इतकी सुंदर जागा सापडणार नाही. पण आम्ही तिथे असतांना पाऊस पडत असल्याने शेवटचे दोन दिवसच हा आनंद उपभोगता आला.

या खोलीत एक निळ्या रंगाची खिडकी दिसली. नंतर कळलं की ती खिडकी नसून एका दरवाज्याचं लाकडावर काढलेलं चित्रं आहे.

माइक आणि लुईस हे एक आतिथ्यशील दांपत्य आहे. न्याहारीला रोज तेच पदार्थ असत. त्यात फार फरक नसे. पण त्यात जे काही मर्यादित वैविध्य असे त्यात आम्ही आपापल्या आवडीनुसार माईकने विचारल्यावर काय हवं ते सांगत असू. मला अंड्याचं वावडं आहे आणि सॉसेजेस आवडत नाहीत. पण माझ्यासारख्यांसाठी वेगवेगळ्या प्रकारची सिरियल्स जसं की कॉर्नफ्लेक्स, म्युसली असतं. त्यात घालण्यासाठी वेगवेगळी ताजी फळं, सुकामेवा, मध, दही, फ्लेवर्ड योगर्ट, असं सगळं असे. माइक गरम दूध घेऊन येई. लुईसने केलेले ताजे ब्रेड असत. मला क्रझाँ आवडत असल्याने मी सहसा क्रझाँ घेत असे. तिने केलेला बन ( थोडासा आपल्याकडे गुड फ्रायडे नंतर मिळणाऱ्या हॉट क्रॉस बन सारखा दिसणारा) चवीला चांगला असला तरी थोडा कडक असे त्यामुळे तो मी क्वचितच घेई. त्याशिवाय गरम टोस्ट त्यावर लावायला मार्मालेड, दोन प्रकारचे जॅम , लोणी असेच. परतलेले टोमॅटो आणि मश्रूम, पॉरिज हवं असल्यास सांगता येई. मांसाहारी लोकांसाठी अंड्याचे वेगवेगळे प्रकार – ऑम्लेट, स्क्रॅम्बल्ड एग्ज, पोच्ड एग्ज, याव्यतिरिक्त सॉसेजेस हे असतच. गरम कॉफीही तयार असे. हे सगळं होत असतांना आमचा रोजचा कार्यक्रम विचारून दोघंही आम्हाला त्यात मार्गदर्शन करीत असत. तिथे वीज अधून मधून जाते. पण ते नागरिकांना सहसा आधी कळवलं जातं. त्याप्रमाणे ते आम्हाला कळवित. आम्ही सहसा उबरने फिरत असू. पण केप ऑफ गुड होपसारख्या लांबच्या ठिकाणी जायला उबर मिळणं थोडं अवघड होतं. तेव्हा माईकने स्वतःच्या गाडीने कमी खर्चात आम्हाला नेण्याची तयारी दाखवली आणि आमची मोठी सोय झाली. शांतपणे फिरता आलं.

आम्ही फिरून येईपर्यंत त्यांच्या मदतनीसांनी खोली स्वच्छ करून आवरलेली असे. आमच्यासाठी चहाकॉफीचं सामान भरून ठेवलेलं असे. शिवाय सोबत खायला रस्क ( दोनदा भाजलेला, किंचित गोड असा कडक पाव) ठेवलेले असत. मग आम्ही आमच्या कुटुंबाचा आवडता स्क्रॅबलचा खेळ खेळत असू.

आम्ही निघालो तेव्हा माईकने विचारलं , “काय मग घरी जाणार म्हणून फारच खुशीत दिसताय मंडळी.” तेव्हा मी त्याला सांगितलं की या जागेची आम्हाला फार आठवण येईल. ते खरंच होतं.

मामा

नक्की ठाऊक नाही पण हरतालिकेला भावाने बहीणीच्या घरी शहाळी अन् केळी घेऊन जायची आणि ती खाऊन तिने उपास करायचा असा काहीतरी कोकणात प्रघात असावा. कारण आईला एकही सख्खं भावंड नसलं तरी मोठे मामा (वसंत आंगणे), शिरीमामा (श्रीधर आंगणे), शिवबामामा (शिवाजी चव्हाण), रघुमामा (रघुनाथ परब) हे सर्व आईचे मामे, मावसभाऊ शहाळी व केळी घेऊन येत व आईपेक्षाही आम्हा मुलांची चंगळ होई. एकूणच कोकणातला माणूस नातेवाईकांना धरून रहाणारा. त्यातही त्याकाळी मामे, मावस इ. भेदभाव फारसा नसावा. त्यामुळे येजा चालूच असे. माझी धाकटी बहीण निलीमा तर मोठ्या मामांना दत्तक दिल्यासारखी त्यांच्याकडे रहायला होती. त्या मामेभावंडांशी आजही तिचे सख्ख्या भावंडांसारखेच संबंध आहेत.

आमचे शिरीमामा म्हणजे एक वल्ली. त्यांच्या लहानपणचा एक किस्सा सगळे जमल्यावर हमखास सांगितला जाई. लहानपणी ते नात्यातल्या एका लग्नात गेले होते. त्याकाळी मालवणी माणसांच्या लग्नात वडे, काळ्या वाटाण्यांची उसळ नि सोजी म्हणजे तांदळाची खीर हाच बेत असे. तर त्या लग्नात सोजी चांगली झाल्याने संपली. मामांनी वाढणाऱ्याला एक-दोनदा सांगूनही सोजी काही येईना. मग ह्या छोट्या मुलाने रागाने “मिस्टर, सोजी वाढा.” असं म्हटल्यावर सगळे चमकले. बरं पोरगं नवऱ्यामुलाकडचं. मग काय भातामध्ये गूळ, दूध, खोबरं असं काहीबाही घालून सोजी म्हणून वाढलं. शिरीमामांना दशावताराची फार आवड. परेलच्या मैदानात दशावताराचे खेळ आयोजित करण्यात त्यांचा पुढाकार असे.

शिवबामामा नाकीडोळी रेखीव, रंग पक्का आणि केस मात्र ऐन तारूण्यात पांढरे झालेले (केस अकाली पिकण्याचा हा वारसा माझ्याकडेही आलाय). ही एकूणच रंगसंगति त्यांना मात्र शोभून दिसे. हे मामा जवळच रहात. सुंदर, प्रेमळ आणि माझंच नाव धारण करणारी शुभांगीमामी मला फार आवडे. त्यामुळे  बहुधा त्यांच्याच घरी माझा मामेभाऊ प्रशांतला खेळवित माझा मुक्काम कायम असे. शिवबामामा दत्ता सामंतांचे कार्यकर्ते होते. एकदा त्यांच्यावरही हल्ला झाला. त्यातून ते वाचले. मामीच्या दीर्घ आजारपणात नोकरी अन् कार्यकर्तेगिरी संभाळून तिची सेवा करून तिन्ही मुलांचं त्यांनी आईच्या मायेने जे संगोपन केलं त्याला तोड नाही.

माझ्या आयुष्यातल्या दोन महत्त्वाच्या गोष्टी पहिल्यांदा रघुमामांमुळे घडल्या. रघुमामा चित्रकलेचे शिक्षक. फक्त आंगठा असलेल्या हाताने ते सुंदर चित्रं काढीत. लहानपणीच कवितेचा नाद लागलेल्या सहावीतल्या भाचीसाठी त्यांनी भेट म्हणून केशवसुतांच्या कवितांचं पुस्तक आणलं. माझ्या आवडीचं आणि पूर्णपणे माझ्या मालकीचं ते पहिलं पुस्तक. त्या पुस्तकाचं गारूड पुढे बरीच वर्षं माझ्या मनावर होतं. क्रिकेटचं वेड आम्हा मुलींना फार. तेही फक्त मागच्या मैदानावरचे सामने पाहून आणि आकाशवाणीवरचं समालोचन ऐकून. तेव्हा मामांनी खराखुरा सामना दाखवायला आम्हाला ब्रेबॉर्न स्टेडियमवर नेलं. शेष भारत विरूद्ध मुंबई असा सामना होता तो. त्या सामन्यात सोलकर आणि पतौडीने घेतलेले अप्रतिम झेल अजूनही माझ्या डोळ्यांसमोर आहेत.

अजून एक मामा होते बबनमामा (अधटराव). हे नात्यागोत्यातले नव्हते. मानलेले होते. नोकरीनिमित्त इंदौरसारख्या लांबच्या शहरात त्यांना रहावं लागे. आई मला त्यांना पत्र लिहायला सांगे. मायना (ती.मामांस शिरसाष्टांग नमस्कार इ.) आणि थोडाफार मजकूर म्हणजे प्रकृतीची काळजी घ्यावी, खाण्यापिण्याची हयगय करू नये व. आई सांगत असे. बाकीचा मजकूर मी माझ्या मनाने भरत असे. काय लिहित असे ते आठवत नाही. पण उत्तरादाखल येणाऱ्या पत्रातला मजकूर इतका  प्रचंड एकटेपणाच्या भावनेने भरलेला असे की आजही गलबलून येतं आणि आई मला का ती पत्रं लिहायला सांगत असे ते कळतं.

कालौघात, संसाराच्या धबडग्यात या सर्वांशी लग्नकार्यात भेटण्याव्यतिरिक्त फारसा संबंध उरला नाही. मोठे मामा जायच्या काही काळ आधी मामेबहिणीच्या घरी आम्ही दोघं त्यांना भेटायला गेलो. तेव्हा ते म्हणाले,”आता तुझ्याकडे बघून वच्छीताईचा भास होतो.”  खरं तर मी वडीलांसारखी दिसते. केस, उंची, बांधा यामुळे त्यांना तसं वाटलं असावं. पण मला मात्र ते ऐकून फार बरं वाटलं. ( आपल्या आईसारखं दिसायची सुप्त इच्छा असते की काय कोण जाणे). आताच्या मुलांना आईवडीलांच्या मित्रांच्या रूपात असे मामा भेटतही असतील. पण आमची मात्र फार चंगळ होती त्याबाबतीत हे खरं.

बनमस्का

आमच्या कार्यालयातले एक नियमित हजर असणारे सहकारी अचानक वरचेवर रजा घेऊ लागले. मानव संसाधन विभागात काम करीत असल्याने अशा सहकाऱ्यांशी बोलून त्यांची काही समस्या असल्यास त्यांचं समुपदेशन करणं, त्यांना मदत करणं हा माझ्या कामाचा भाग असला तरी ते मला मनापासून आवडे. बोलता बोलता त्यांनी कारण सांगितलं. त्यांना मधुमेहाचा त्रास होता. मी म्हटलं,”अहो एव्हढं घाबरायचं काय त्यात. आता त्यावर औषधं आहेत. शिवाय योग्य आहार आणि व्यायाम यांनी तो नियंत्रणात रहातो.” “पण म्याडम, अहो मी पोतंभर जांभळाच्या बियाची पूड खाल्ली. तुम्हाला सांगतो पोतंभर मेथीची पूड खाल्ली. आपल्या ब्यांकेच्या डॉक्टरने दिलेली औषध् खाल्ली. काही फरकच नाही बघा.” असं सांगत बसले. शेवटी गप्पा मारता मारता बरं न होण्याचं खरं कारण बाहेर पडलं. “म्याडम, मला ना बनमस्का फार आवडतो बघा. घरून मस्कापाव खाऊन निघतो. मग चर्चगेटला आपलं ते इराण्याचं हाटेल आहे का (स्टेडियम रेस्ताँरा) त्याने मला पाहिलं की तो बनमस्क्याची प्लेट तयारच ठेवतो. मग ऑफिसात आलो की कँटीनला पुन्हा मस्कापाव खातो. नि मग फक्त संध्याकाळी एकदा खातो.” बनमस्का तुम्हाला कितीही आवडत असला तरी तो तुमचं काय नुकसान करून देऊ शकतो हे पद्धतशीर पटवल्यावर त्यांनी तो कमी करायचं वचन दिलं. हळूहळू त्यांचा मधुमेह आटोक्यात आला. हे सांगायचं कारण असं कि मलाही बनमस्का त्यांच्यासारखाच आवडतो. अर्थात योग्य आहाराच्या चौकटीत बसत नसल्याने मी तो फारसा खात नसले तरी मधूनच कधी तरी हुक्की येतेच. बनमस्क्याशी माझ्या बऱ्याच आठवणी जोडलेल्या आहेत.
लहानपणी आमच्या चाळीत एक दहा अकरा वर्षांचा मुलगा दारावर भीक मागायला येई. तो एक गाणं म्हणे. ते असं.
माझी लाडाची, लाडाची बायको ।
पावबरोबर मस्का खाते, भाकर म्हंते नको नको ।। माझी लाडाची बायको।।
आम्ही पुन्हा पुन्हा ते गाणं त्याला म्हणायला लावीत असू. आमच्या बाबीकाकांकडे मी गणपतीची मूर्ती बनवायला शिकायला जात असे. तेव्हा बाबीकाका नुकतेच नाश्ता करीत असत व तो साखर घातलेल्या दुधासोबत मस्कापावचा नाश्ता आम्हालाही मिळे. 
एक जरा दुःखी आठवणही आहे. पंडित नेहरू मुंबईत आले होते. त्यांच्यासमोर शाळकरी मुलांची नृत्ये होणार होती. आमच्या शाळेच्या गटात मीही होते. सोबत घरून डबा न्यायचा होता. माझ्या गिरगांवातल्या शाळेतल्या मैत्रिणींनी छान छान खाऊ आणला होता डब्यात. आई हॉस्पिटलात असल्याने घाईघाईत मला मात्र बनमस्का दिला होता बहिणीने. मला तो आवडेच. पण माझ्या डब्यातला बनमस्का पाहून मैत्रिणी आणि शिक्षिकांनी नाकं मुरडल्यावर मला मात्र कानकोंडं वाटलं.
मी आणि चंदर नोकरी करता करता शिकत असू. संध्याकाळी एम.ए.ची लेक्चर्स एल्फिन्स्टन महाविद्यालयात असत. काम आटोपून तिथे जातांना खूप भूक लागे. मग जवळच्या आर्मी अँड नेव्ही रेस्ताँरात एक चहा आणि एक बनमस्का दोघात मिळून घेण्याएव्हढे पैसे दोघांजवळ आहेत का याचा तपास आधी करावा लागे.
नंतर मात्र एकावेळी डझनभर बनमस्के घेण्याएव्हढे पैसे जवळ असले तरी कधी घेतले नाहीत. हे सर्व आठवायचं कारण हे की परवा हैदराबादला ओवी आम्हाला सार्वी नावाच्या बेकरीत घेऊन गेली. तिथे मी काचेआड तो पाहिला. मस्त मऊ, फुललेला बन, त्यावर साखर पेरलेली. काऊंटरवरच्या माणसाला विचारलं तर म्हणाला साध्या बनमध्ये आत लोणी आहे आणि तो बेक करतांना साखर पेरलीय. मी काही न बोलता तिथून हलले. थोड्या वेळाने चंदर एका कागदी पुड्यात तो घेऊन आला. मी म्हटलं,”अरे कशाला आणलास?” “मला तुझ्या डोळ्यात त्याची लालसा दिसली मला. अगं, खावं असं कधीतरी तुझ्या मते आरोग्याला घातक असलेलं काहीतरी अधूनमधून.” मग मागच्या बाजूला सार्वीच्याच कॅफेमध्ये आम्ही तो गरमागरम, नरमानरम बनमस्का चहासोबत फस्त केला.
जाता जाता सार्वीविषयी. तिथे सगळेच पदार्थ चविष्ट असले तरी कष्टकरी वर्गाला परवडतील अशा किंमतीत होते. चहा बारा रूपये. चिकन समोसा दहा रूपये. असंच सगळं. शिवाय हैदराबाद स्पेशल उस्मानीया बिस्कीटं. मुंबईच्या इराण्याकडे जमतात तसे लोक तिथे गप्पा झोडायला जमतात. आजूबाजूचे पत्रकारही तिथे पडीक असतात. आवडलंच मला. आर्मी अँड नेव्हीत गेल्यासारखं वाटलं बरेच दिवसांनी.


बुडते हे जन

आज बातमी पाहिली की यवतमाळमध्ये काही काश्मीरी तरूणांना मारहाण झाली. सामाजिक माध्यमांवरून जे विष ओकलं जातंय त्याला सर्वसामान्य माणूस बळी पडतोय. मध्यंतरी ईशान्य भारतीय तरूणांवर बंगरूळूत आणि देशाच्या अन्य भागांमध्ये हल्ले झाले. मुंबईतही उत्तर भारतीयांना मारहाण करण्यात आली होती. कोण आहेत हे सगळे? तुमच्या आमच्यासारखेच चांगलं शिक्षण घेता यावं, ते शांततापूर्ण वातावरणात घेता यावं, आयुष्यमानाचा स्तर उंचावता यावा यासाठी धडपडणारे. त्यासाठी कष्ट करणारे. भारतीय लोकही जगाच्या कानाकोपऱ्यात त्यांच्यासारखेच जातात. हेच सगळं करायला. काही ठिकाणी त्यांनाही वर्णविद्वेषाला बळी पडावं लागतं. त्यावेळी सगळेच हळहळतात. मग आपल्याच देशवासीयांना हे सहन करायला लागतं त्यावेळी ही सहवेदना कुठे जाते?

वर्ध्यातली खादाडी

यशवंतराव दाते स्मृती व्याख्यान देण्यासाठी माझ्या नवऱ्याला वर्ध्यात आमंत्रण होतं. त्या निमित्ताने आम्ही तीन दिवस वर्ध्यात होतो. मूळचे विदर्भातले  मित्र अविनाश कोल्हे आणि विदर्भातलेच कवी मोहन शिरसाट यांच्यासोबत पहिल्या दिवशी आणि नंतर आयोजक दातेदांपत्य (प्रदीप दाते आणि रंजना दाते), राजेंद्र मुंढे, संजय इंगळे तिगांवकर इ.सोबत वैदर्भी खाद्यपदार्थांचा आस्वाद घेतला वर्ध्यातल्या तीन वेगवेगळ्या भोजनगृहांमध्ये. पहिल्या दिवशी ‘वऱ्हाडी ठाट’ मध्ये झुणका, शेवभाजी, भाकरी आणि वांग्याचं कच्चं भरीत खाल्लं. सोबत दिलेल्या ठेच्यावर घ्यायला छोट्या वाटीत जवसाचं तेल दिलं होतं. कच्चं भरीत प्रथमच खाल्लं. त्यात भाजलेल्या वांग्याच्या गरात पातीचा कच्चा कांदा, कच्चा टोमॅटो, मिरची लसणाचा ठेचा, कोथिंबीर असं सगळं घातलेलं होतं. इथलं जेवण थोडं तिखट असलं तरी चवीला बरं होतं.

दुसऱ्या दिवशी आम्ही तिगांवकरांच्या धाब्यावर गेलो. इथले पदार्थ अधिक चविष्ट पण थोडे तिखट होते. इथे पदार्थांचं वैविध्य होतं. गेल्या साली आम्ही एक दिवसासाठी वर्ध्यात आलो असतांना इथे जेवलो होतो. तेव्हा फणसाची मसालेदार रसभाजी खाल्ली होती. यावेळी निवांतपणा असल्याने काय पदार्थ मिळतात, कसे केले जातात हे पाहिलं. बसायला मेज आणि खुर्च्यांची सोय होतीच. पण आपण धाब्यात आहोत याची जाणीव करून देणारी खाटेवर, खाली जमिनीवर बुटक्या बैठ्या मेजाभोवती  बसून जेवायचीही सोय होती. बायका चुलीवर स्वैंपाक करीत होत्या. इथेही पातोडी, शेवभाजी, झुणका, ठेचा, कढी,  या गोष्टी असल्या तरी काही वेगळ्या गोष्टी होत्या. नामदेवभात असं फळ्यावरच्या पदार्थांच्या यादीत लिहिलेलं दिसलं. तो समोर आल्यावर चाखला तर तांदूळ, तूरडाळ आणि भाज्या यांची मसालेदार खिचडी असावी तसा लागला. छान होता. इथेही वर्ध्यात इतरत्र आढळणारी खवापोळी आणि पुरणपोळी होती. मऊसूत, गोडीला व्यवस्थित, वरून भरपूर तूप अशा या दोन्ही पोळ्या होत्या. रंजनावहिनी म्हणाल्या की इथं तुरीचं अळाणही मिळतं. ते करतांना तुरीचे दाणे उकडून, भाजून वाटले जातात, मग  मिरच्या, कांदा, टोमॅटो भाजून त्यांचंही वाटण केलं जातं. जिरंमोहरीच्या फोडणीत हे वाटण, हळद, तिखट, धणेपूड घालून तेल सुटेपर्यंत परतून मग त्यात तुरीचं वाटण घालून एक वाफ द्यायची आणि गरम पाणी, मीठ घालून नीट ढवळून एक उकळ काढली की तय्यार अळाण.

तिसऱ्या दिवशी आम्ही रसोई नावाच्या धाब्यावर गेलो. इथल्या फळ्यावर लिहिल्यानुसार इथले पदार्थ जवळपासच्या नैसर्गिक शेती करणाऱ्या शेतकऱ्यांकडून घेतलेले धान्य, भाज्या यांचा वापर करून केलेले होते. त्यात आवारातच असलेल्या घाणीवर काढलेल्या तेलाचा वापर केला होता. डेरेदार झाडं असलेलं, प्रशस्त, हिरवंगार, स्वच्छ आवार होतं. साध्या लाकडाची मेजं आणि खुर्च्या वेगवेगळ्या रंगात रंगवलेल्या होत्या. त्यांनी वातावरणात जरा रंग भरला होता. इथलं जेवण दातेसाहेबांच्या शब्दात मुंबईपुण्याकडच्या लोकांना आवडेल असं म्हणजे फारसं तिखट किंवा तेलकट नसलेलं होतं. इथे वडाभात मिळत होता. बाकीचे पदार्थ इतरत्र मिळणारे असले तरी  इथे आम्हाला कोहळ्याची बोंडं खायला मिळाली आणि अंबाडीच्या फुलांचं सरबतही इथेच पहिल्यांदा चाखलं. हे सरबत बरंचसं कोकम सरबताची आठवण करून देणारं होतं. तसंच धापोडे  नावाचे ज्वारीचे पापडही इथे पहिल्यांदा खाल्ले. संध्याकाळी गाडीत बसायच्या आधी रात्रीच्या जेवणासाठी मऊसूत पोळ्या आणि चविष्ट फ्लॉवरची भाजी बांधून घेता आली.

मराठीच्या बोलीभाषांमधले शब्द

आमच्या लहानपणी चाळीत शेजारी एक सातारकडच्या बाई विचारीत “ जीवलं का?” आम्हाला ते जिवलगा ऐकू येई. आम्ही म्हणायचो या जिवलगाबद्दल आपल्याला का विचारताहेत. पण नंतर कळलं की तुमचं जेवून झालं का अशा अर्थी त्या जेवलात का असं विचारताहेत.

मालवणीत “चाय खल्लीस?” असं चहा प्यायलात का अशा अर्थी विचारतात हे मला माहीत आहे (बंगाल्यांच्या जोल खाबे सारखं मालवणी चहा खातात). पण वास्तव्य मुंबईत झाल्याने आणि नंतर एका घाट्याशी लग्न केल्याने मालवणीच्या माझ्या ज्ञानाला मर्यादा आहेत. त्यामुळे मालवणीत जेवलात का या अर्थी काय काय विचारलं जातं हे मला फारसं ठाऊक नाही.

परवा चंदरचा आणि माझ्या पुतण्याचा जेवलास का या अर्थी संवाद झाला. त्यातून जुन्नर भागातले याबाबतीतले वाक्प्रयोग सापडले. “भाकर खाल्लीस का?” हे आपलं साधसुधं, सरळ. पण विचारणाराच्या मूडप्रमाणे आणि परिस्थितीतल्या बदलानुसार “गिळलंस का ?”, “ऱ्याटं गिळायला कसा येऊन बसतो”, “गुणरोक खायला फुडं आन कामाला मागं”, “रेचकलं?”, “खदाडलं?”, “हादाडलं?” असं काय काय सापडलं. मग मरण पावणे याला वेगवेगळे शब्द शोधले. मेला, गचाकला, वर गेला, वारला, पोहोचला, निधन पावला, मरण पावला, मृत्यू झाला, स्वर्गवाशी झाला, निर्वाण झालं, अंत झाला. मी म्हटलं,”पण तुम्ही हल्ली आपल्याकडे चलनात असलेला शब्द विसरलात. तो म्हणजे ऑफ झाला.” शेवटी चंदर म्हणाला,”असो, सगळे इथेच राहोत.”

पारध्याचं जाळं आणि चांदण्यांची छत्री

त्या काळी भावंडं बरीच असत. अंतरही फारसं नसे दोन भावंडात. मोठ्या भावंडांची पुस्तकं, चपला, कपडे धाकट्यांना मिळत. मी तर आठ भावंडातली पाचवी. त्यामुळे हे सर्व माझ्या बाबतीतही घडत असे. त्यात काही वाटतही नसे तेव्हा कुणालाच. पण एकदा शाळेत जाळ्यात अडकलेल्या सिंहाची आणि उंदराची ती सुप्रसिद्ध गोष्ट सांगतांना सिंह ज्या जाळ्यात अडकला ते पारध्याचं जाळं कसं होतं ते सांगतांना गुरूजींनी माझ्या फ्रॉककडे बोट दाखवित म्हटलं, “हिच्या फ्रॉकसारखं  होतं ते जाळं”. मुळात छान फिक्कट निळसर रंगाचा नायलॉनचा, पुढे जाळीची लेस असलेला तो फ्रॉक माझ्याकडे येईतोवर त्याची जाळी थोडी अधिकच वाढली असावी कदाचित. नंतर जेव्हा जेव्हा तो फ्रॉक मी घालत असे (आणि त्या काळी एक दांडीवर, एक अंगावर इतकेच कपडे अगदी चांगल्या सुस्थितीतल्या सर्वांच्या कडे असत, त्यामुळे ती वेळ दर दिवसाआड येई) मला ते आठवून शरमल्यासारखं होई. याच्या अगदी उलट घडलं काही वर्षांनी. लांब दांड्याची, छान आभाळी निळ्या रंगाची मोठ्या बहीणीची छत्री तिला छोटी छोटी भोकं पडायला लागल्यावर मला मिळाली. एक दिवस ती छत्री घेऊन मी पावसात रस्त्यावरून जातांना मागून एक बाबा आपल्या मुलाला किंवा मुलीला सांगत होते, “त्या ताईची छत्री काय मस्त चांदण्याची आहे ना?” “बाबा, कुठेयत चांदण्या?” “ते काय निळं आभाळ आणि छोट्या छोट्या चांदण्या.” मला इतकं आवडलं ते नाव. पुढची बरीच वर्षं तिला चांदण्यांची छत्री हेच नाव होतं आणि चांदण्यांनी आभाळ भरून जाईपर्यंत मी ती वापरली.

प्रकाशनाची प्रेरणा

मी काही लिहिलं की अगदी सुरूवातीचे एक दोन दिवस जवळच्या माणसांना दाखवून (आता वॉट्स अॅपवर पाठवून ) त्यांच्या प्रतिक्रिया मागवते. कुणी अनुकूल, कुणी प्रतिकूल प्रतिक्रिया देतं, कुणी काही बदल सुचवतं. कधी कधी असंही होतं की लिहिल्यावर आपलं आपल्यालाच काहीतरी अपुरं आहे असं जाणवतं. मग अर्धवट रंगवून वाट पहात बसलेल्या चित्रफलकासारखी ती कविता, कथा कुठेतरी तळाशी पडून रहाते. कधी जोमाने उसळून नवं काही घेऊन येते, अपुरंपण मिटवून टाकते. पण काही दिवसांनी आपण काही नवं केलंय याचं अप्रुप ओसरतं. कुणाच्या काही प्रतिक्रिया आल्या तरी फरक पडत नाही. हे सगळं कशासाठी? कुठे, कुणापर्यंत पोचणार? हे कुणापर्यंत पोहोचवावं इतकं महत्त्वाचं आहे का? ही अशी ‘स्वतःच्या लेखनाला फालतू समजण्याची गोष्ट’ सुरू होते.

माझं जाऊं द्यात हो. परवा आमचे गुरू , मार्गदर्शक आणि जेष्ठ मित्र प्रा. सुभाष सोमण सर यांना बऱ्याच काळानंतर भेटलो. खूप गप्पा झाल्या. गप्पांच्या ओघात विषय निघाला की सर चांगल्या कविता लिहित. त्यांच्या कविता काही मोजक्या नियतकालिकांतून प्रसिद्ध झाल्या होत्या, त्यातलं एक सत्यकथा. आणि त्या काळी सत्यकथेत एखादी कविता छापली गेली की तो कवी थोरच ठरत असे. ते फार वेगाने आणि पुष्कळ लिहित नसत. पण तरीही ज्या काही मोजक्या कविता लिहिल्या त्यांचा संग्रह तर काढला नाहीच पण प्रसिद्धही केल्या नाहीत. त्यांचं म्हणणं होतं की त्यांना त्या प्रसिद्ध कराव्या असं कधी मनापासून वाटलं नाही. ते म्हणाले की तसं तर तेंडुलकरांनी ( प्रा. रमेश तेंडुलकर) कुठे कविता फारशा प्रसिद्ध केल्या. त्यांची समीक्षा जितकी प्रकाशित झाली त्या प्रमाणात त्यांच्या कविता त्यांच्या हयातीत प्रकाशित झाल्या नाहीत. तेंडुलकर सरांची कविता खरं तर मोजक्या फटकाऱ्यांनी एखादं चित्र रेखाटावं तशी. तरल. (नंतर त्यांचे चिरंजीव कवी नीतिन तेंडुलकर यांनी सरांच्या कविता प्रकाशित केल्या ) पण ते कवी म्हणून ऐन भरात असण्याच्या काळात तर नाहीच पण तब्बल पन्नास वर्षे कविता लिहूनही त्यांनी त्या प्रकाशित केल्या नाहीत याचं कारण हेच असेल का?